Baramati News l थंडीत राबणाऱ्या हातांना 'मायेची ऊब'..! ऊसतोडणी कामगारांना उबदार कपड्यांचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता. बारामती) येथील साद संवाद स्वच्छता टीमच्या वतीने दरवर्षी राबवला जाणारा उबदार कपडे संकलन व वितरण उपक्रम सामाजिक उपक्रम ठरला आहे. थंडीच्या प्रतिकूल परिस्थितीत मजुरांना आधार मिळावा या हेतूने जुने पण उत्तम स्थितीत असलेले स्वेटर, जॅकेट, शाली आणि सामान्य वापराचे कपडे गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे हे काम सातत्याने केले जाते.
                वाणेवाडी, सोमेश्वर परिसर तसेच बारामती शहरातील सोसायट्यांमध्ये जाऊन परिचित-अपरिचित नागरिकांना आवाहन करून कपडे संकलन करण्यात आले. गोळा केलेले कपडे सोमेश्वर कारखाना गाडी तळ येथे ऊसतोडणी मजूर, महिला तसेच लहान मुलांना वाटप करण्यात आले. थंडीपासून संरक्षण मिळाल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसून आले.
रविवारी (दि.३०) रोजी आयोजित कार्यक्रमात साद, संवाद, स्वच्छताचे अध्यक्ष नवनाथ भोसले, सदस्य शशिकांत जेधे, प्रीतम भोसले, प्रा.राजू बोत्रे, अमोल कालेकर, गणेश सावंत, अथर्व सटाले, अंकित जगताप, प्रफुल्ल जगताप, ओंकार जाधव, कैवल्य कालेकर यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी कोपीवरची शाळेचे नौशाद बागवान व संतोष होनमाने यांनी साथ दिली. न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी येथील शिक्षिका प्राजक्ता सोळस्कर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करून कपडे संकलित करण्यात योगदान दिले. 
          साद संवाद स्वच्छता टीमतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे सलग पाचवे वर्ष असून, वृक्षारोपण, व्याख्यानमाला व विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील सेवा कार्य सातत्याने सुरू आहे. थंडीच्या दिवसांत ऊसतोड मजुरांना आधार ठरलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, मानवतेची ज्योत कायम ठेवणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
To Top