सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर बस स्थानकात भोर - स्वारगेट एसटीत आंबाडे (कोळेवाडी) येथील वयस्कर महिला प्रवास करण्यासाठी चढत असताना महिला चोर करिष्मा करण सकट (रा.सायगाव ता.उदगीर जि. लातूर) हिने गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरून पलाईन केले होते.याची भोर पोलिसांना तात्काळ माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बस स्थानकात सापळा रचून मांढरदेवीला जाणाऱ्या प्रवासी वाहनात सीताफिने चोर पकडला.याची फिर्याद भोर पोलिसात भरत शिवराम रांजणे (रा. कोळेवाडी ता. भोर) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भरत रांजणे यांची आई भोर - स्वारगेट बसने पुणेकडे जात होती.बसमध्ये चढताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत फिर्यादी यांच्या आईच्या गळ्यातील दीड तोळ्याचे १ लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र तोडून पलाईन केले होते.काही वेळाने फिर्यादी यांच्या आईच्या आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याचे लक्षात आल्याने मुलगा भरत रांजणे यास कळविले.भरत रांजणे यांनी तात्काळ भोर पोलिसांना याची माहिती दिली.भोर पोलिसातील कर्मचारी धर्मवीर खांडे,हेमंत भिलारे ,वर्षा भोसले,अतुल मोरे तसेच स्थानिक तरुण आकाश सागळे,जावेद आतार यांनी भोर बस स्थानकात सापळा रचून चोरट्यावर बारकाईने लक्ष ठेवीत एक तासात मांढरदेवीला जाणाऱ्या खाजगी वाहनात बसलेल्या चोरट्या महिलेला ताब्यात घेतले. चोरट्याने काही वेळातच चोरी कबुली करून दीड तोळ्याच्या सोन्याचे पोलिसांकडे सुपूर्त केले.मंगळवार आठवडे बाजाराच्या दिवशी झालेल्या चोरीतील चोरट्याला तात्काळ पकडल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
