Khnadala News l शिरवळ ग्रामपंचायत ठरली खंडाळा तालुक्यातील पहिली पेपरलेस व डिजिटल ग्रामपंचायत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
आजच्या आधुनिक तंत्राच्या युगात शिरवळकर नागरिकांना शिरवळ ग्रामपंचायतीमार्फत सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून आधुनिकतेकडे वाटचाल करीत खंडाळा तालुक्यातील पहिली पेपरलेस डिजिटल ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळविण्यात शिरवळ ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे.
       यामध्ये शिरवळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये न येता मोबाईल अँपच्या माध्यमातून शिरवळकरांना ग्रामपंचायतीशी निगडित सर्व कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिरवळ लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.    
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल तांबे,संग्राम देशमुख,रोहित जाधव,अँड.आनंद फडके,माजी सरपंच व विदयमान सदस्य छाया जाधव,रुपाली गिरे,पुजा मगर,दिपाली बोडरे,शोभा गायकवाड,सुरेखा हाडके,सोनाली देशमुख,ग्रामसाँफ्ट साँफ्टवेअर
अधिकारी जयश्री फडतरे,ग्रामपंचायत अधिकारी बबनराव धायगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी रविराज दुधगावकर म्हणाले,शिरवळ ग्रामपंचायतीने डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करत ग्रामसाँफ्टच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील पहिली पेपरलेस व संपूर्ण डिजिटल ग्रामपंचायत म्हणून मान मिळवला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,कर्मचारी प्रशिक्षण आणि नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देत शिरवळ ग्रामपंचायतीने  स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे.पूर्वी ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे,फाईल प्रक्रिया आणि प्रत्यक्ष उपस्थिती यावर भर होता मात्र आता संपूर्ण प्रणाली डिजिटल झाल्यामुळे मिळकत उतारे,जन्म-मृत्यू दाखले,कर भरणा,नोंदवही,ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून मंजुरी प्रक्रिया,शासकीय योजना अर्ज,बांधकाम परवानगी,कर देयके,प्रमाणपत्रे अशा सर्व सेवांचा लाभ नागरिकांना अँपच्या माध्यमातून ऑनलाइन मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर,उपसरपंच अमोल कबुले,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी बबनराव धायगुडे,तांत्रिक सल्लागार यांचे विशेष योगदान राहिल्याचे सांगण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्विकार करून शिरवळ ग्रामपंचायतीने डिजिटल इंडिया मोहिमेला हातभार लावत तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. 
----------------------
पेपरलेस कामकाज — कागद वापरात मोठी घट-रविराज दुधगावकर, लोकनियुक्त सरपंच, शिरवळ
ऑनलाइन कर भरण्याची सुविधा
जन्म-मृत्यू दाखले घरबसल्या उपलब्ध
ई-फाईल सिस्टीममुळे कामकाज जलद व पारदर्शक नागरिकांसाठी डिजिटल हेल्पडेस्कची स्थापना,'ई-ग्रामस्वराज' व ‘राष्ट्रीय पंचायती राज प्रणाली’शी जोडणी झाल्याने व शिरवळ ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिजिटल प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे तसेच येणाऱ्या काळात ग्रामस्थांना डिजिटल सेवांचा वापर सुलभ व्हावा यासाठी शिरवळमध्ये डिजिटल साक्षरता मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे.
------------------
शिरवळकर नागरिकांनी मोबाईल नंबरची नोंद करावी-सरपंच रविराज दुधगावकर
शिरवळ ग्रामपंचायतच्यावतीने डिजिटल अभियानअंतर्गत शिरवळ ग्रामपंचायतचे सर्व रेकॉर्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याकरिता शिरवळकर नागरिकांनी आपले मोबाईल नंबर व इतर माहिती ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे.त्याकरिता शिरवळ ग्रामपंचायतमार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून शिरवळमधील नागरिकांनी शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करावी असे आवाहन शिरवळ सरपंच रविराज दुधगावकर यांनी केले आहे.
To Top