Pune News l दोघांचं आळंदीच्या शाळेत मनच रमत नव्हतं म्हणून गावाकडे लातूरला जायला निघाली : पुण्यात भरकटलेले दोन चिमुकले बारामतीतील युवकांच्या सतर्कतेमुळे पालकांच्या स्वाधीन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
आळंदी येथील शाळेतून बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले अखेर सुखरूपपणे त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची  घटना आज समोर आली. गणेश मल्लिनाथ बिराजदार आणि पार्थ व्यंकट पाटील (वय अंदाजे ७ ते ८ वर्षे ) रा. किल्लारी ता. अवसा जि. लातूर
अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत.
            माहितीनुसार, शाळेत मन न रमत असल्याने ही दोन्ही मुले शाळेतून न सांगता निघून चालतच घराच्या दिशेने निघाली. मात्र परिसराची माहिती नसल्याने ती भरकटली आणि आळंदीहून चालत थेट पिंपळे निळख परिसरात पोहोचली.
         दरम्यान, एका सिग्नलजवळ प्रसाद संजय भगत रा. कोऱ्हाळे ता. बारामती जि. पुणे यांच्या निदर्शनास ही दोन्ही मुले रडत असताना आली. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी त्वरित मुलांकडे चौकशी केली. चौकशीत ही मुले आळंदी येथून बेपत्ता झाल्याचे आणि त्यांना घरी जायचे असले तरी मार्ग माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर प्रसाद भगत यांनी तात्काळ आपल्या मित्र पृथ्वीराज पाटील सद्या राहणार बारामती. मूळ रा. जाजनुज ता.निलंगा जि. लातूर  यांच्याशी संपर्क साधून मुलांच्या पालकांचा शोध सुरू केला. दोघांनीही तत्परतेने पुढाकार घेत मुलांना वाकड पोलीस ठाण्यात दाखल केले. पोलिसांच्या मदतीने मुलांची शाळा, शिक्षक तसेच पालकांचा शोध घेण्यात आला.
       सुमारे दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर मुलांच्या मामांशी संपर्क साधण्यात यश आले. त्यानंतर मुलांच्या वडिलांशी आवश्यक खातरजमा करून दोन्ही मुलांना त्यांच्या मामांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात प्रसाद भगत आणि पृथ्वीराज पाटील यांच्या सतर्कता, सामाजिक भान आणि माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या तत्परतेमुळे दोन निष्पाप चिमुकल्यांचे प्राण सुरक्षित राहिले, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
To Top