सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
आगामी 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026' आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने वाहतुकीचे सविस्तर नियोजन जाहीर केले आहे. 22 जानेवारी रोजी होणाऱ्या या 137 किलोमीटरच्या स्पर्धेदरम्यान सासवड, जेजुरी, वडगाव निंबाळकर, सुपा आणि बारामती या तालुक्यांतून जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक बदल (Pune Traffic Diversion) करण्यात येणार आहेत.
खेळाडूंची सुरक्षा आणि स्पर्धेचे सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक बंदीची वेळ: 22 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रमुख रस्ते बंद राहतील.
जड-अवजड वाहनांसाठी विशेष बंदी: 21 जानेवारी रात्री 10 वाजल्यापासून ते 22 जानेवारी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जड वाहनांना या मार्गांवर प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
बंद : वळवण्यात आलेले प्रमुख मार्ग:
या स्पर्धेमुळे अनेक महामार्ग, घाटमार्ग आणि चौक प्रभावित होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मार्गांचा समावेश आहे:
हडपसर-सासवड-जेजुरी रोड
सासवड-कापूरहोळ मार्ग
सासवड-वीर मार्ग
जेजुरी-सातारा मार्ग
बारामती-निरा-सातारा मार्ग
शिरूर-सातारा हायवे
इंदापूर-बारामती रोड
भिगवण-बारामती रोड
पालखी महामार्गावरील अनेक चौक
बारामती एमआयडीसी, काटेवाडी पूल, जळोची पूल, रुई ब्रिज आणि वंजारवाडी ब्रिज यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.
नागरिकांना आवाहन:
जरी ही स्पर्धा जिल्ह्याच्या पर्यटन आणि जागतिक ओळखीच्या दृष्टीने महत्त्वाची संधी असली, तरी दैनंदिन प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अनावश्यक प्रवास टाळावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
