सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील रुई परिसरात २३ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातून होणारा मानसिक त्रास, ब्लॅकमेलिंग व लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी एका तरुणीसह तिच्या कुटुंबातील तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई, बाजीनगर, बारामती) असे आहे. विक्रमने दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये लोखंडी हुकाला साडीने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेनंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने रुई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा घटनास्थळी पोलिसांना विक्रमने लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली आहे. या नोटमध्ये सृष्टी विकास मते ही तरुणी आणि तिचे कुटुंबीय माझ्या मृत्यूस जबाबदार असल्याचे विक्रमने नमूद केले आहे. विक्रम व सृष्टी यांच्यात गेल्या ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तक्रारीनुसार, सृष्टीने लग्नाचे आमिष दाखवून विक्रमकडून वेळोवेळी पैसे घेतले. नंतर लग्नास नकार देत त्याला मानसिक त्रास देण्यात आला. तसेच फोटो व चॅट्स डिलीट करण्यासाठी ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोपही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
कुटुंबीयांकडून धमकावल्याचा आरोप तक्रारीनुसार, सृष्टीचे वडील विकास मते व बहीण श्रुती विकास मते यांनीही विक्रमला फोनवरून धमकावले होते. विक्रमचे मामा सत्यवान आप्पा इंगळे (रा. वाफेगाव, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाणे येथे सृष्टी विकास मते, श्रुती विकास मते आणि विकास मते (सर्व रा. खडकवासला, पुणे) यांच्याविरुद्ध B.N.S.S. कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१(२), ३५१(३), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंदा कदम करत आहेत. एका तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
