Baramati Breaking l अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील मेसेज ; डिप्लोमा कॉलेजमधील प्राध्यापकावर गुन्हा..

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एका प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकवर्गात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
         नितीन शंकर तावरे (वय ४२, रा. सांगवी ता. बारामती) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव असून त्यांच्याविरुद्ध प्राचार्य संदीप रमेश शहा यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, संबंधित प्राध्यापकाने प्रथम वर्षातील अल्पवयीन विद्यार्थिनींना त्यांच्या इच्छेविरुद्ध व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील संदेश पाठवले. संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत मूल्यमापनातील ३० गुण न देण्याची धमकी देण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच वर्गात शिकवताना विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श करणे, जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आणि विरोध केल्यास वर्गात अपमानास्पद वर्तन करणे असे प्रकार २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. “डे”च्या नावाखाली गुलाब, टेडी, चॉकलेट देणे आणि सूचक वक्तव्य करणे असे प्रकारही समोर आले आहेत.

पीडित विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन घडलेला प्रकार मांडला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेला तात्काळ तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी पोक्ससह इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
To Top