Satara Breaking l गुरुजींच्या कृत्याने शिक्षण क्षेत्राला काळिमा; सातारा जिल्ह्यात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सातारा : प्रतिनिधी
शाळा हे ज्ञानाचे मंदिर मानले जाते, जिथे पालक आपल्या पाल्यांना सुरक्षित भविष्याच्या आशेने पाठवतात. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर येथे या विश्वासाला तडा देणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका शिक्षकाने चक्क 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी इयत्ता नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
             ही घटना शनिवारी, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. संबंधित शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावले. शिक्षकाने अचानक बोलावल्याने मुलगी घाबरली होती, त्यामुळे ती आपल्या तीन मैत्रिणींना सोबत घेऊन गेली. मात्र, शिक्षकाने इतर मैत्रिणींना पुन्हा वर्गात पाठवून दिले आणि पीडित मुलीला एकटीलाच थांबवून घेतले. "मी तुझ्यावर प्रेम करतो..." त्यानंतर शिक्षकाने मुलीला विचारणा केली की, "मी तुला चार दिवसांपासून बोलावत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजेपर्यंत व्हॉट्सॲपवर ऑनलाइन का असतेस?" इतक्यावरच न थांबता, "मी तुझ्यावर प्रेम करतो" असे म्हणत त्याने पीडितेचा हात पकडला. या धक्कादायक प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिने प्रसंगावधान राखत शिक्षकाचा हात झटकला आणि तिथून थेट वर्गाकडे धाव घेतली.


पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणींना आणि त्यानंतर कुटुंबीयांना सांगितला. आपल्या मुलीसोबत घडलेला हा निंदनीय प्रकार ऐकून पालकांनी तात्काळ कराड शहर पोलीस ठाणे गाठले. रविवारी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संबंधित नराधम शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

To Top