सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीत तरुणीचा रस्ता अडवून अपहरण, मारहाण व लज्जाभंग; आरोपी थेट येरवडा कारागृहात बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका गंभीर व संतापजनक घटनेत पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई करत आरोपीस अटक केली असून न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यास येरवडा केंद्रीय कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यात आले आहे.
दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी देशमुख चौक परिसरात एका तरुणीचा रस्ता अडवून आरोपी ओंकार अशोक जाधव (रा. हरिकृपानगर, ता. बारामती) याने तिची दुचाकी जबरदस्तीने थांबवून चावी हिसकावून घेतली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिला स्वतःच्या घरी नेऊन मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तिच्या लज्जेस धक्का पोहोचविणारे कृत्य केले. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथम पोलीस कोठडी रिमांड मंजूर झाली होती. पुढील सुनावणीनंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी (MCR) मंजूर करण्यात येऊन त्यास येरवडा केंद्रीय कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत स्त्रीच्या लज्जेस धक्का पोहोचविणे, अपहरण, मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणे या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
बारामती शहर पोलिसांचा इशारा: महिलांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा सहन केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. गुन्हेगार कोणताही असो, त्यास कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा भोगावीच लागेल. नागरिकांनी कोणताही त्रास, छळ किंवा गुन्हा झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई तपासी अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांनी पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड व बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
