सुपे दि. २६ (वार्ताहर) बारामती तालुक्यातील सुपे परिसरात मागिल आठवड्यापासुन पुणे, मुंबई व इतर बाहेरुन येणाऱ्या सुमारे ६४७ जणांचे होम क्वारंटाईन होणार आहे. या व्यक्तिंनी स्वतः घरात सुमारे १४ दिवस थांबायचे असुन काही त्रास जाणवल्यास १०४ हेल्पलाईनला संपर्क साधण्याचे आवाहन महसुल विभागाने केले आहे.
या परिसरातील सुप्यासह दंडवाडी, खोपवाडी, शेटेवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, बोरकरवाडी, चांदगुडेवाडी, खंडुखैरेवाडी, मांगोबाचीवाडी आदी ठिकाणी पुणे, मुंबई व इतर बाहेरुन आलेल्या सुमारे ६४७ जणांच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्के मारण्यात येत असल्याची माहिती गावकामगार तलाठी दिपक साठे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी दिली.
बारामतीच्या पश्चिम पट्टयातील सुपे परिसरात अद्याप कोरोनाचा फैलाव झालेला नाही. या विषाणूचे गांभीर्य लक्षात घेवुन नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मात्र या आठवड्यात सुप्यासह बारावाड्यात पुणे, मुंबई येथुन येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासंदर्भातील सर्वेक्षण आरोग्य पथकाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे शहरा बरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होवु नये यासाठी बाहेरुन आलेल्या सुमारे ६४७ जणांना होम क्वारंटाईन करण्याच्या सुचना शासनाच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्याचे तलाठी साठे यांनी दिली. त्यानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तिंच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच त्यांना बाहेर फिरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या काळात काही त्रास जाणवु लागल्यास शासनाच्या १०४ हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन साठे यांनी केले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने नागरी भागात जमावबंदीचे आदेश लागू करूनही लोक रस्त्यावर घोळक्याने जमा होत आहेत. इकडून तिकडे फिरणाऱ्या वाहनांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्यानुसार शासनाने परिसरातील पेट्रोलपंप सीलबंद केले असुन रिकामटेकड्यांकडे पोलिसांची मेहरनजर असणार आहे.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावांमधील ठराविक दुकानातुनच किराणा माल, भाजीपाला तसेच चिकन व मटण मिळणार आहे. यासंदर्भात त्याची यादी बनविण्याचे काम सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. मात्र त्या दुकानाच्या बाहेर एक मिटर तसेच त्यापेक्षा जास्त सुरक्षित अंतर ठेवण्यात येणार आहे. यावेळी ग्राहकांनी दुकानात गर्दी करु नये अशी सक्त ताकीद देण्यात येणार असल्याचे सपोनि लांडे यांनी सांगितले.