अबब...बारामतीत एका दिवसात तब्बल तीन कोटीच्या सोन्याची खरेदी
बारामती : प्रतिनिधी
कोरोनामुळे अनेक मुहूर्त चुकलेल्या बारामतीकरांनी सराफा दुकानांकडे धाव घेत कालच्या एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी केली आहे.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे,. देश ऑरेंज, ग्रीन आणि रेड झोनमध्ये विभागण्यात आलाय. जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात झोनप्रमाणे काही सवलती देण्यात आल्या आहेत. दरम्यान बारामतीत सराफा बाजारपेठेतील दुकाने सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे अनेक मुहूर्त चुकलेल्या बारामतीकरांनी सराफा दुकानांकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. सराफ व्यावसायिकांकडून दिलेल्या माहितीनुसार काल एकाच दिवसात तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने खरेदी केले.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सराफ व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, मानसिकतेमुळे लोक सोने खरेदी करणार नाहीत असे सगळे अंदाज फोल ठरवत लोकांनी सोन्याची लयलूट केली.