वडगाव निंबाळकर -प्रतिनिधी
संतोष भोसले
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशासनाने त्वरित वडगाव निंबाळकर गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
वडगाव निंबाळकर येथील जगताप वस्तीवर आपल्या मुलीला भेटण्यासाठी एक महिला 15 मे रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईहून आली होती. दरम्यान तिला यापूर्वीच ताप येत होता. घशातही खो- खो होत होती. पेशी कमी झाल्याने हवापालट करण्यासाठी मुंबईहून वडगावला त्या आल्या होत्या. मात्र, येथेही त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्याला नेण्यात आले. ससूनमध्ये त्यांची तपासणी केली असता, त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सोमवारी दि.१८समोर आले. त्यामुळे अवघ्या एका दिवसाच्या मुक्कामात किती जणांना कोरोनाचा संसर्ग झाला, याची माहिती काढण्यात स्थानिक प्रशासनाची धांदल उडाली आहे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. वडगाव निंबाळकर येथील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडाउनदरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. गेली दोन महिने कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेली दोन महिने लॉकडाउनमुळे या भागातील सर्व कामे ठप्प झाली होती. गेली काही दिवस शेतकरी यांच्यासह सर्वच व्यवसायिक अडचणीत आले होते. ग्रामपंचायतीने पूर्ण गाव बंद ठेवण्याची भूमिका घेतली होती. गेल्या आठ दिवसांत काही दुकाने सुरू ठेवण्यास ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे आता पूर्ण गाव पुन्हा बंद करण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील व्यक्तिंना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला असून नागरिकांनी बाहेर न पडून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. परिसरातील गावांत पुणे आणि मुंबई येथे कामासाठी राहत असलेले अनेकजण मूळगावी येत आहेत. याची माहिती प्रशासनास देउन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करून घेण्यासाठी त्या गावातील ग्रामपंचायतीने यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.