सोमेश्वरच्या उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात : लॉकडाउन चा फायदा कोणाच्या पथ्यावर

Admin
सोमेश्वरच्या उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात :  लॉकडाउन मुदतवाढीचा फायदा कोणाच्या पथ्यावर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. यामुळे सर्वच संचालक मंडळाला मुदत वाढऊन मिळाली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची देखील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सोमेश्वर च्या संचालक मंडळाला जवळपास एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 
         सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष यांची मुदत सोमवार (दि.३) रोजी संपत असून यानंतर या पदावर कोणाला संधी मिळणार याकडे कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागले आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करंजेपुल येथील सभेत एक अध्यक्ष आणि पाच वर्षात पाच संचालकांना उपाध्यक्षपदी संधी देणार असल्याचे आश्वासन पाळले आहे. विद्यमान संचालकमंडळाची मुदत १७ एप्रिलला संपली असून कोरोना पार्श्वभूमीवर सहकार खाते आणि निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच सहकारी संस्थेच्या निवडणुका जानेवारी २०२१ पर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी सहाव्या संचालकाला उपाध्यक्ष पदावर संधी मिळावी अशी अपेक्षा इच्छुक संचालकांनी व्यक्त केली आहे.  यामुळे राज्यात अग्रेसर असलेल्या सोमेश्वर कारखान्यात उपाध्यक्षपदी माळ अजित पवार कोणाच्या गळ्यात टाकतात याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. 
           पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर उपाध्यक्षपदी सुरुवातीला संचालक उत्तम धुमाळ, लक्ष्मण गोफणे, सिध्दार्थ गीते, लालासाहेब माळशिकारे आणि विद्यमान उपाध्यक्ष शैलेश रासकर यांना संधी मिळाली. विद्यमान संचालकमंडळाचा कालावधी संपला असला तरीही त्यांना निवडणुकीपर्यंत कामकाज पहावे लागणार आहे. त्यामुळे गेल्या वेळेस उपाध्यक्षपदाची संधी हुकलेले संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, ज्येष्ठ संचालक नामदेवराव शिंगटे आणि महिलांमधून ऋतुजा धुमाळ यांनी उर्वरित काळात या पदावर संधी मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
           सोमेश्वर कारखान्याने सभासदांना राज्यात क्रमांक एकचा ऊसदर दिला आहे. राज्यात अग्रेसर असलेला कारखान्यात संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी यासाठी अनेक पदाधिकारी इच्छुक असतात.  
To Top