दिवाळीनंतर उडणार बारामती तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

Admin
दिवाळीनंतर उडणार बारामती तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

१ जुलै ते ३१ डिसेंबर पर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून बारामती तालुक्यातील सुमारे ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने पुढील दोन महिने गावकारभारी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी पायाला भिंगरी बांधून कामाला लागणार आहेत. तर काहींनी आतापासूनच निवडणुकीची तयारी करत गाठीभेटींवर भर देण्यास सुरुवात केली आहे.ऑगस्ट महिन्यातपर्यंत तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे तर नोव्हेंबर महिन्यात ४ ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. 
            मुदत संपणाऱ्या व नविन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीची प्रभागरचना व आरक्षणास मान्यता देण्यात आल्याने बारामती तालुक्यात आता निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने सहकार खात्याच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना वारंवार मुदतवाढ दिली. राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने आता ग्रामपंचायत निवडणूक कधी होणार याकडे तालुक्याचे लक्ष होते. बारामती तालुक्यातील जवळपास निम्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने पुढील काही दिवस प्रशासनावरील ताण वाढणार आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासनाच्या नेमणुका झाल्या असून त्यांच्याच हातात गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायतीचा कारभार आहे.गेल्या सात महिन्यांपासून कोरोनामुळे गावतील विकास कामांना खीळ बसली असून पदाधिकाऱ्यांना इच्छा असूनही काम करता आले नाही.ग्रामपंचायतीची निवडणूक गावकीभावकीवर ठरत असल्याने यात कोण कोणाचा काटा काढतो हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. बारामती तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच दोन गटात काही ठिकाणी तुल्यबळ तर काहीठीकाणी बिनविरोध निवडणुका पार पडतील.

................

तालुक्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबरपर्यंत संपत असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे

अंजनगाव, बऱ्हाणपूर, आंबी, बाबुर्डी, चोपडज, ढाकाळे, ढेकळवाडी, देऊळगाव रसाळ, गोजुबावी, घाडगेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, जळगाव सुपे, जोगवडी, जैनकवाडी, कटफळ, कारखेल, कांबळेश्वर, कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी, खंडोबाचीवाडी, खांडज, लाटे, माळेगाव खुर्द, माळवाडी(लाटे), माळवाडी(लोणी), मेखळी, मोढवे, नारोळी, निंबुत, निरावागज, पिंपळी, सावळ, सांगवी, शिरवली, शिरिष्णे, सोनवडी सुपे, सोनगाव, तरडोली, उंडवडी सुपे, वढाणे, वडगाव निंबाळकर, वाकी, झारगडवाडी, माळेगाव बुद्रुक, पाहुणेवाडी, मळद आणि कन्हेरी.
To Top