सुपे येथील मोबाईल दुकान फोडणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद : अवघ्या ७२ तासात अवळल्या मुसक्या
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सुपे ( ता. बारामती ) येथील नवजीवन मोबाईल शॉपी फोडुन ९ लाख ३० हजाराच्या मुद्देमालाचा पोबारा करणारे चोरटे अवघ्या ७२ तासात वडगाव निंबाळक पोलिस ठाणे व पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेशन विभागाने संयुक्त कारवाई करीत पाचही आरोपी जेरबंद केले. त्यामुळे पोलिसांचे येथील ग्रामस्थांकडुन कौतुक होत आहे.
अतुल पोपट येडे ( वय २५ रा.लिंगाळी ता.दौड ), मिथुन प्रकाश राठोड ( वय १९ ), संदिप बाबुराव राठोड ( वय-२४ ), आकाश मच्छिंद्र गुजाळ ( वय २२ ) आणि १ अल्पवयीन मुलगा ( रा.राधोवानगर, गिरीम ता.दौंड ) आदी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
येथील एसटी बसस्थानक परिसरातील नवजीवन मोबाईल शॉपीमध्ये चोरट्यानी शुक्रवारी मध्यरात्रीला शटर उचकटुन काच फोडुन चोरी केल्याचे शनिवारी सकाळी उघडकिस आले होते. यावेळी दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, एलईडी टिव्ही, पेनड्रायव्ह, चांदीचे शिक्के, मेमरीकार्ड असा सुमारे ६ लाख तर ३ लाख ७० हजाराच्या रोख रकमेसह एकुण ९ लाख २६ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवुन अवघ्या ७२ तासात ९ लाख ३० हजाराच्या मुद्देमालासह पाच आरोपी जेरबंद केले.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधिक्षक अभिनय देशमुख, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोसई योगेश शेलार, स्थनिक गुन्हे शाखाचे शिवाजी ननवरे यांनी गुन्हा उघकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक योगेश शेलार, श्रीगणेश कवितके, सहाय्यक फौजदार डी. एस. जाधव, पोलिस कॉंस्टेबल के. व्ही. ताडगे, विशाल नगरे, हिरालाल खोमणे, सलमान खान, अक्षय सिताप, भाऊसाहेब मारकर, अमोल भुजबळ आदींसह पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेशन विभागाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, अनिल काळे, रविराज कोकरे, पोलिस नाईक राजु मोमीन, विजय कांचन, अमिजीत यांनी अवघ्या ७२ तासात चोरीचा छडा लावुन पाच आरोपींना अटक केली. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती सपोनी लांडे यांनी दिली.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज व गोपीनय बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहितीनुसार अतुल पोपट येडे ( वय २५ रा.लिंगाळी ता.दौड ) याने त्याच्या चार साथीदारासह गुन्हा केल्याचे उघडकिस आले. त्यानुसार येडे यास ताव्यात घेवुन चौकशी करुन त्याचे साथीदार मिथुन प्रकाश राठोड ( वय १९ ) संदिप बाबुराव राठोड ( वय-२४ ), आकाश मच्छिंद्र गुजाळ ( वय २२ ) आणि १ अल्पवयीन मुलगा ( रा.राधोवानगर, गिरीम ता.दौंड ) या सर्व पाचही आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यामुळे पाचही आरोपींना तात्काळ ताव्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेला मुद्देमालासह अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक योगेश शेलार करीत आहेत.