'आशा' प्रकल्पामुळे 'सोमेश्वर' कारखान्यावरील ऊसतोड मजुरांची मुले गिरवतायेत 'अक्षरे'
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
गावाकड कोरोनामुळे शाळा बंद हाय....म्हणून पोर-बाळ सोबत घेऊन आलोय. कोरोना ची भीती वाटत होती. पण ऊसतोडी करण्याशिवाय पर्याय नाही. कारखान्यावर आलोय इथ पण शाळा बंद आहेत. पण इथं पोर कोपीवर शिकत हायत. अक्षर गिरवतायेत. समाधान वाटत...असे विष्णू सुळे आणि आजिनाथ सुळे या मुळच्या बीड येथील पालकांनी सांगितले.
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टस मुंबई, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याच्या सहकार्याने ‘आशा प्रकल्प काम करत आहे. कोरोना काळात मुल शाळेपासून दुरावली जाऊ नये या करिता प्रकल्पाच्या माध्यमातून लेखन – वाचन उपक्रम तळावर राबवला जात आहे. कोरोना आजार जगभर पसरल्याने शाळा बंद आहेत. दरवर्षी विदर्भ- मराठवाडा या भागातून ऊसतोड करण्यासाठी कारखान्याकडे स्थलांतर करत असतात. ऊसतोड करण्यासाठी येताना मुले गावाकडे नातेवाईक, वस्तीगृह अश्या ठिकाणी शाळेच्या सोयीसाठी ठेवत असतात. तर काहीची सोय होत नाही ते सोबत घेऊन येतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने बहुतांश ऊसतोड कामगार मुलांना सोबत घेऊन आले आहेत.
‘आशा प्रकल्पा’च्या माध्यमातून सोमेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १८५३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अहमदनगर, औरंगाबाद ,बिड, बुलडाणा ,धुळे जळगाव, जालना ,नंदुरबार ,नाशिक ,उस्मानाबाद ,परभणी ,पुणे ,रायगड ,सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यातील तर मध्यप्रदेश मधून सुद्धा ऊसतोड कामगार आले आहेत. मुलांचे केलेल्या सर्वेक्षणात ० ते १८ वयाची २२२७ मुले आढळून आली आहेत. यामध्ये ० ते ६ ची ७०५, ६ ते १४ ची १२५२ तर १५ ते १८ वयाची २७० मुले असल्याची सर्वेक्षणाअंती दिसून आले. ‘आशा प्रकल्पा’ने गेल्या चार वर्षातील तुलनेत केलेल्या सर्वेक्षणात ६ ते १४ वयाची सर्वाधिक १२५२ मुले तळावर आढळून आली आहेत.
शाळा सुरु असताना या ऊसतोड कामगारांच्या मुलांना नजिकच्या शाळेत दाखल करण्याचे काम प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येत होते. शाळा बंद असल्याने या मुलांना शाळेत दाखल करणे अशक्य झाले. परंतु ‘आशा प्रकल्पाच्या’ माध्यमातून या मुलांना त्यांच्या कोपीवर जाऊन कार्यकर्ते मुलांना साक्षर करण्यासाठी धडे घेत आहेत.
गावाकडे शाळेत जात असलेली मुले कोरोनामुळे पालकांच्या सोबत आल्याने दिवसा शाळा ऐवजी फडात तर हातात पेना एवजी कोयता दिसू लागला आहे. परंतु तळावर फडातून आल्यावर ‘आशा’चे कार्यकर्ते हातातील कोयता बोधट करण्याच्या दृष्टीने ७८ तळावर जाऊन लेखन -वाचन वर्ग घेत आहेत. मुलांना लोकसहभागातून साहित्य उपलब्ध झाल्याने मुले तळावर अक्षर गिरवताना आणि गाणी म्हणत असल्याने आमची मुले साक्षर होतील असे ऊसतोड कामगार बोलून दाखवत आहेत.
दरवर्षी सोमेश्वर कारखान्यावर मुले आली की, आशाचे कार्यकर्ते मुलाना शाळेत दाखल करत. आणि तळावर खेळ, गाणी, शैक्षणिक उपक्रम घेत. परंतु यंदा शाळा बंद असल्याने कोप्यावर जाऊन रात्रीच्या वेळी लेखन-वाचन उपक्रम राबत अभ्यास वर्ग घेऊन मुलांना साक्षर करण्यासाठी त्यांचे दूत बनले आहेत.
COMMENTS