कुणी ग्रामसेवक देता का ग्रामसेवक : वाणेवाडी ग्रामपंचायतीला टाळे ठोकलेल्या सदस्यांनीच पसरले बीडीओ पुढे हात
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
वाणेवाडी(ता. बारामती) ग्रामपंचायतीचे काम सुरळीतपणे सुरु असतानाच आक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकावर गैरव्यवहाराचे आरोप करत इतिहासात प्रथमच ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते. तत्कालीन ग्रामसेवकांनी थेट चार महिन्यापासून रजा टाकली. यानंतर बारामतीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून याठिकाणी नव्याने महिला ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात आली मात्र त्यांनीही पूर्णपणे चार्ज न घेतल्याने आर्थिक विकासाला चार महिन्यापासून खीळ बसली आहे. फक्त उतारे घराचे उतारे देणे आणि दाखले देणे म्हणजे ग्रामपंचायतचा कारभार पूर्ण होत नाही. ग्रामपंचयात कामगारांना गेल्या चार महिन्यापासून पगार नाही, तसेच गावात कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार होत नसल्याने गावाच्या आर्थिक व्यवहाराचा खेळखंडोबा टाळे ठोकणाऱ्या सदस्यांनीच केला असल्याची भावना जनसामान्य ग्रामस्थांनीची झाली आहे.
ग्रामस्थांची कामे न होणे, कर्मचाऱ्यांचे पगार, निधी असूनही कामे न होणे आदी कामे रखडल्याने गाव विकासापासून दुर जात आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१८) रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी बारामतीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांना निवेदन देत ग्रामसेवक देण्याची मागणी केली. ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आणि ग्रामसेवकावर आरोप करत बदलीची मागणी केली त्यांनीच आज अर्ज करून बीडीओकडे ग्रामसेवक देण्यासाठी हात पसरल्याचे वाणेवाडीकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले.
तत्कालीन ग्रामसेवक सदस्यांना मनमानी कारभार करून देत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी सदस्यांनी केली होती. यानंतर त्यांनी ऑक्टोबर पासून रजा टाकली. नव्याने आलेल्या ग्रामसेवकांनी पूर्णचार्ज घेण्याआधीच याठीकाणी येणे बंद केल्याने चार महिन्यापासून गाव कारभार ग्रामसेवका विना सुरु आहे.