बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजना व घेण्यात येणा-या निर्णयाबाबतची बैठक आज पार पडली.
यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, सिल्वर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव व बारामती शहरातील व्यापारी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
बारामती शहरातील सूर्यनगरी, गणेश मंडई व ग्रामीण भागातील माळेगाव ब्रु., पणदरे, गुणवडी ही कोरोनाची हॉट स्पॉट ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करुन सर्वेक्षण व टेस्टींग तात्काळ करण्यात यावे, तसेच जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या SOP प्रमाणे 50% कर्मचा-यांच्या उपस्थित आस्थापना चालवण्यात यावी, SOP चे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावे तसेच जे नियम पाळत नाहीत त्यांची आस्थापना /दुकाने सिल करण्याची कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.