सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती महावितरणकडे बाह्यस्रोत(कंत्राटी कामगार) म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३०३ कर्मचाऱ्यांचे पगार जानेवारी पासून रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्व कर्मचारी ठेकेदाराकडे काम करत असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांबरोब प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर काहीजण ऑपरेटर म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून काम करत आहेत. त्यांना नोकरीत कायम करण्याची कोणतीही शक्यता नसूनही केवळ आपल्या कुटुंबाचा आधार बनून हे सर्व कर्मचारी दिवसरात्र प्रामाणिकपणे काम करत आहेत.
वरीष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर हतबल होण्याची वेळ आली आहे. पगारासाठी आज उद्याची आश्वासने दिली जात आहेत तर ठेकेदार यांनी दिलेला सुपरवायझर हा फोन उचलत नाही. मात्र पगार झाल्यावर किंवा पगार करायच्या वेळी कामगारांना प्रत्येकी ५०० रुपये मागण्यासाठी फोन केला जातो. नवीन मुलांना कामावर घेण्यासाठी मुलांकडून ५ हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप याठिकाणी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रति महिना १७६८५ रुपये पगार असताना प्रत्यक्षात १३ ते १४ हजार रुपये पगार दिला जात आहे. याशिवाय भविष्य निर्वाह भत्ताही भरला जात नसल्याने दादा कोणाकडे मागायची असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातच ही परिस्थिती असेल तर अन्य तालुक्यात काय स्थिती असेल असा सवाल उपस्थित होत आहे.
या सर्व कामगारांनी कोरोनाच्या काळात आपले काम पूर्ण क्षमतेने बाजवले आहे. मात्र कामगारांच्या पगाराच्या वेळीच कोणतेही अधिकारी लक्ष का देत नाहीत हे न समजणारे कोडे आहे.