करंजे ग्रामपंचायत चौकशी अहवालात सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर ताशेरे : खुलासा मागवणार गटविकास अधिकारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

करंजे (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीत झालेल्या अनियमितेबाबत, हिशोब पत्रके, बोगस बीले, आणि अतिक्रमणाची चौकशी पूर्ण झाली असून चौकशी अधिकारी तथा विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडागळे यांनी बारामतीचे गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे. यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर ताशेरे ओढत अनियमितता झाल्याचा तर काही ठिकाणी रक्कम वसूलपात्र असल्याचा अहवाल सादर केला आहे. याबाबत येथील राकेश बबन गायकवाड यांनी पंचायत समितीकडे तक्रार अर्ज करत ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

          दिवाबत्तीची नावाखाली वेळोवेळी फक्त साहित्याची  बीले आणून प्रत्यक्ष कामकाज केले नाही. एलईडी बल्ब खरेदी करताना शासनाने ठरवून दिलेल्या तरतुदीनुसार मासिक सभेत ठराव न घेता दरपत्रक सादर केले नाही त्यामुळे बाजार मुल्य आधारित रकमेचा फायदा झाला किंवा कसे याबाबत मेळ घेता आला नसल्याने सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका ठेवला आहे. अंगणवाडी केंद्राचा अहवाल सादर करणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले असले तरीही येथील कामाचे मुल्यांकन केले नाही त्यामुळे येथे केलेला खर्च मान्य नसून १ लाख २६ हजार ही रक्कम आक्षेपाहीन ठेवण्यात आली असून सदर रक्कम वसूल पात्र ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करताना जाहिरात देण्यात आली नव्हती याशिवाय  ५ च कॅमेरे बसविले असताना १२ कॅमेरे बसविल्याचे दाखविण्यात आले आहेत. याशिवाय दरपत्रके यांची मागणी केली नसल्याचे बाजारी मुल्याचा फायद्यापासून ग्रामपंचायतीस वंचित ठेवून आर्थिक तोटा केला असून यास सरपंच ग्रामसेवक जबाबदार असून या आर्थिक व्यवहारात कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

        कोरोना काळात आशा वर्करसाठी ५६ हजार  रुपयांचे किट खरेदी केले असून ते नियमित आहे. वाढदिवसाच्या जाहिरातीवंर नियमबाह्य खर्च केला असून यासाठी खर्च केलेले १५ हजार रुपये रक्कम वसूलपात्र असून ती सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून समप्रमाणात वसूल करण्याचा आदेश दिला आहे. शेतकरी सहलीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडीचे भाडे दिले असून हा खर्च निवडणुकीचा आहे असे म्हणता येणार नाही.मुरमीकरणासाठी केलेला खर्च अंदाजपत्रका नुसार केला आहे. तसेच सरपंच यांच्याकडे काम करणारा कर्मचारी इतरत्र काम करु शकत नाही असे म्हणता येणार नसल्याने त्याचे बील देणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या नावावर बोगस बिल काढले असे म्हणता येणार नाही. बाबुराव धनु गायकवाड यांच्या नावे असलेली गावठाण मधील अतिक्रमणातील जमीन नोंद ही वारसा हक्काने पुढे गुलाब बाबुराव गायकवाड यांच्या नावे झाली असून ही नियमानुसार असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

        वृक्षलागवडीसाठी ६३ हजार रुपये रक्कम खर्च करण्यात आली असून या कामाचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे हा बोगस केलेला खर्च आक्षेपाधिन ठेवण्यात आला असून या खर्चास सरपंच व  ग्रामसेवक यांना दोषी ठरविण्यात आले आहे. १४ व्या वित्त आयोगातील बाके खरेदीत ही अफरातफर झाली असून यात ही सरपंच व ग्रामसेवक दोषी ठरले आहेत. शासनाच्या नियमानुसार मंदीर किंवा धार्मिक स्थळे बांधण्यास मनाई असताना अभ्यासिकेत देवीची मूर्ती बसवून निधीचा बेकायदेशीर वापर केला असल्याचे ताशेरे अहवालात ओढले आहेत. 
____________

संबंधित सरपंच व ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीसा काढून खुलासा मागविण्यात येणार आहे. यानंतर संबंधित अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात येईल. 

राहुल काळभोर, गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती.
To Top