सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतीश आटोळे यांचे अर्धवट मोबाईल रेकॉर्डिंग व्हायरल करून विरोधी गटाचे सदस्य पृथ्वीराज नलवडे यांनी ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली असून याबाबत खरी वस्तुस्थिती तालुक्याचे आमदार व आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातली असून आम्ही ग्रामसेवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे थोपटेवाडी गावच्या सरपंच रेखा बनकर यांनी सांगितले आहे. वास्तविक याआधीही ग्रामसेवक आटोळे यांनी याच गावामधे पाच वर्ष काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या चोख कामाची पद्धत नागरिकांना माहिती असल्याने गावचे नागरिक अशा गोष्टींचे समर्थन करणार नसल्याचेही सरपंच उपसरपंच व सत्ताधारी सदस्यांनी सांगितले आहे.
गायरान गट नंबर १२० मध्ये अतिक्रमण सुरू असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे प्राप्त झाल्यानंतर ग्रामसेवक आटोळे यांनी संबंधित सर्वांना नोटीस काढल्या होत्या. मात्र विरोधी सदस्य यांनी ग्रामसेवकांना फोन करून तुम्ही एक जणालाच नोटीस काढत असल्याचे सांगितले. यावर ग्रामसेवक यांनी मी पाहणी करून सर्व अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसा काढल्या आहेत. आपण मला सांगू नका ,मला माझं काम करू द्या, तसेच आपण अतिक्रमणाला ही प्रोत्साहन देऊ नका अन्यथा आपले पद कायद्याने धोक्यात येऊ शकते असे सुनावले असता या विरोधी सदस्याने रागाला जाऊन कर्तव्यदक्ष ग्रामसेवकांची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत मार्फत आम्ही सत्य वस्तुस्थिती लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळविले असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनाही या संदर्भात माहिती दिली आहे. यावर अजित पवार यांना सुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश केले आहेत.