वटपौर्णिमेचे शास्त्र, जुन्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळणे अतियोग्यच आहे पण का? : डॉ महेश गायकवाड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

भारताचे राष्ट्रीय झाड वड असून भारतभर सगळीकडे आढळणारे हे झाड बहुउपयोगी आणि जीवनदायी मानले जाते. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय यावर अनेक पक्षी आपल्या वसाहती अर्थात सारंगगार निर्माण करतात. शिवाय वटवाघळे आपली वस्ती या झाडांवर मोठ्या प्रमाणात करतात, कारण याच्या फांद्या खूप मजबूत असतात, अगदी शेंड्या लगतच्या छोट्या फांद्या सुद्धा मजबूत असतात, त्यामुळे वटवाघळे यावर आपली वस्ती करतात. शिवाय थंडीच्या मोसमात अनेक पक्षी आपल्या वसाहती वडाच्या झाडांवरच मुद्दाम ठेवतात कारण यावर उबदारपणा इतर झाडांपेक्षा जास्त मिळतो, हेसुद्धा विसरून चालणार नाही. लहानपणी वडाच्या पारंब्या खेळणे हा तर प्रत्येकाचा छंदच असतो, या पारंब्यावर झोका घेणे अतिशय साहसी खेळ म्हणून लहानपणी आपण सगळे खेळलो आहोत. शिवाय उंदीर मोठ्या प्रमाणावर या झाडांभोवती असतात, त्यामुळे बहुतेक वेळा सापही झाडाच्या फांद्या वर दिसून येतात. अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी ही झाड महत्वाची मानली जातात. 
वडाच्या झाडाला पूर्वीपासून प्रथेनुसार कापसाच्या दोरीने अर्थात धाग्याने गोलाकार गुंडाळी केली जाते, हे इतके मजबूत गुंडाळी असते की, झाडाचे खोड वाढत नाही. खरी गंमत इथंच तर आहे, कारण जेवढी गुंडाळी मजबूत तेवढे झाडावरील फांद्यांच्या खालून पारंब्या जास्त सुटतात. याच पारंब्या वडाच्या झाडाला अधिक मजबूत करतात. पारंब्या म्हणजे झाडाचे नवीन आयुष्य वाढत असते. या पारंब्याला मूळ असतात तीच पुढे जमिनीत रुजतात आणि पुढे त्याचे महा वटवृक्षात रूपांतर होते. तसेच या सणात दोरीने गुंडाळी केल्याने वडाचे झाड सर्वात जास्त ऑक्सिजन निर्मिती करीत असते, म्हणून या झाडाखाली सावित्रीच्या पतीचे प्राण वाचले होते, अशी खरी कथा आहे.  मात्र हझाडाला गुंडाळी करताना झाड खूप जुने म्हणजे शतक पार केलेलं असावे. अर्थात नैसर्गिकरित्या पारंब्या फुटलेल्या असाव्यात, तरच दोरीची गुंडाली वडाला गुंडाळावी, अन्यथा झाड लहानच राहील. नवीन लागवड केलेल्या झाडाला दोरीची गुंडाळी अजिबात करू नये. 
भारतात अशी समजूत आहे की, प्रत्येक व्यक्तीने किमान 2 तरी वड लावले पाहिजेत, तरच पापाचे परिमार्जन होते. पूर्वजांनी वटपौर्णिमा हा सण खास अश्या जटाधारी व जीवनदायी वृक्ष म्हणून पुजले जाते. 
वटवृक्षाप्रमान, पिंपळ, उंबर, पिंपळ, नांद्रुक, पिंपरन ही भारताची जैवविविधता सांभाळणारी देशी झाड. शिवाय वडाप्रमान विशाल असतात. फक्त वडासारख्या या वृक्षाना पारंब्या नसतात. मारुती चितमपल्ली यांच्या सोन्याचा पिंपळ या लेखात त्यांनी खूप सविस्तर वर्णन केले आहे, । काक विष्टेचे झाले पिंपळ । कावळे उंचावर बसून जिथं विष्टा टाकतात, तिथं पिंपळाची लहान रोपे वाढताना दिसतात. शिवाय अनेक पक्षी जसे कोकिळा, तांबट, भोरड्या तसेच फलहारी वटवाघळे या झाडांच्या बिया निसर्गात पसरविण्याचे काम करीत असतात. ही रोप इमारती आणि मंदिर यांच्या भिंतीच्या फटीतून वाढतात.
जिथं या कुळातील जवळपास 700 पेक्षा जास्त प्रजाती ची झाड सापडतात. मग काय हो भारतभर सर्व प्रकारच्या जंगलात व जमिनीत ही सहजपणे आढळतात. जटाधारी वड म्हणून वडाची ख्याती आहे. वड, पिंपळ, नांद्रुक ही झाड लावायची असतील तर याची 3 फुटापेक्षा जास्त लांबीची फांदी घेऊन, पारीने जमिनीत भोक पाडावे व त्यात फूटभर खोल फांदी पुरावी. फांदी लावताना कधीही खड्डा करून फांदी लावू नये, अशी फांदी जळून जाते. म्हणून भोक पाडून त्याला दगड मातीचे आळ करवून पाणी द्यावे. 
अहो बोथे गावात ता. माण येथे उंबराची मूळ अर्थात उंबराच पाणी , याला स्थानिक भाषेत "शिंनकुल" असे या गावात याला नाव आहे. अगदी पूर्वी पासून लोक अनेक वेळा साथीचे आजार आले की पाणी प्यायला देत असत. 
गोवर, देवी, मोठीआई आली अर्थात याच पाणी घेऊन मुलांना आंघोळ घालत असत, अर्थातच गोवर आजार आला की परिसरात सर्वजण याच उंबराच पाणी देत असत. अहो सातारा पासून अनेक डॉक्टर सुद्धा अनेक वेळा पाणी घेऊन जात असत. मात्र पाणी इतकं थंड असते, माझे आजोबा डॉ मारुती गायकवाड यांनी मला एक भन्नाट किस्सा सांगितला की, एक शेतकरी दुपारचा पाणी प्यायला आला , पाणी पिताना त्याचा विळा त्या शिंनकुळात अर्थात छोट्यास्या कुंडात पडला, काहीवेळाने त्यान तो वर काढला, व काखेत अडकवला, आणि तंबाखू मळू लागला, मात्र अचानक विळा अडकवलेला हातच तुटून पडला, इतकी धार त्या पाण्यात पडलेल्या विल्याला धार आली. त्यानंतर दीड वर्षाने तो माणूस मेला, त्यांचं नाव नावडकर होत. ही बाब त्यांनी सांगीतली मात्र भविष्यात मी त्या माणसाच्या घरी जाऊन विचारपासू नक्कीच करेन....
अनेक गाव सुद्धा या झाडांच्या नावाने आहेत, त्यातील कथा सुद्धा भन्नाट आहेत, यात वडाचीवाडी, उंबरे, उंबरी, पिंपरी चिंच-वड अशी नाव प्रचलित आहेत. 
शिवाय आदिवासी पाड्यात वडाचे पाणी, उंबराच पाणी, जळूच पाणी, करंजाच पाणी, अशी पाणथळ सुद्धा खूपच महत्वाची आहेत. आजही आदिवासी बांधव या पाण्याचा वापरून अनेक आजार बरे करतात. तसेच आजही खेडेगावात कांजण्या आजार आला की, लहान मुलांना उंबराच्या मुळांचे पाणी प्यायला देतात, अहो अगदी दोन तासात फरक पडतो. कांजण्या 100 टक्के बऱ्या होतात. 
जैवविविधता पूरक म्हणण्याचा अर्थ असा आहे की , बहुतेक वन्यजीव अश्या झाडांभोवती आढळतात, अगदी रान लाल झालं की, अनेक भागात शिकारी माणस रान लाल झालं की, त्याखाली वन्यजीवांची शिकार करतात, कारण बहुतेक वन्यजीव याची लालसर गोडसर फळे खायला येतात. रान लाल होणे म्हणजे या झाडाची फळे जमिनीवर पडून लाल रंग तयार होतो.
खरतर प्रत्येक झाडावर एक पुस्तक तयार होईल एवढी माहिती आहे, मात्र अगदी मोजकीच माहिती देण्याचा विचार आहे. 
उंबर अर्थात औदुंबराच्या फळाचा वापर तर लोक मोठ्या प्रमाणात करतात, उंबराच्या दोड्या तर खूप रुचकर असतात, हिरवी उंबर तोडून शिजवून, मग धुवून चिरून, कांदा व तेलात परतायच्या, मग बघा स्वाद. आता आपण पर्यावरण संरक्षण करण्यासाठी उंबराचा मोठा वाटा आहे. 
यात उंबर आणि दत्त देवाचे नात मात्र खूप घट्ट आहे, दत्तात्रेयला तीन तोंड तशी उंबराच्या फुलाला पण तीनच तोंड आहेत, हे विज्ञान लक्षात ठेवा. हे झाड सर्वात जास्त भूजल पातळी वाढविण्यासाठी मदत करते, काहीजण तर सांगतात, दररोज एक उंबराच झाड जवळपास 1200 लिटर पाणी भुजलात सोडत, आपल्या मुळामार्फत. याच्या मुळांची लांबी मोजली तर 48 किमी लांब असते, जर सर्व मुळ्या कापून मोजल्या तर. एवढे महान जलसंधारण चे काम करीत असतो उंबर म्हणून त्याला दत्त गुरूंचे स्थान मिळाले आहे, त्याचे संवर्धनासाठी ही बाब पूर्वजांनी आपल्याला सांगितली आहे. 
निसर्ग तज्ञ श्री मारुती चितमपल्ली, आवर्जून सांगतात प्रत्येक शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये चारही बाजूला चार उंबराची झाडं लावली पाहिजेत जेणेकरून जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के पाणी बचत होईल. शिवाय जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सुपीक माती उंबराच्या झाडाखालीच असते, असंख्य जिवाणू नी तयार झालेली ही माती, आपण आजही घटस्थापना करताना घटात टाकून त्यावर अनेक प्रकारची बीजे लावतो, व तपासणी करतो, पेरणीपूर्वी ची, उगवण क्षमता योग्य की अयोग्य. 
उंबराचे फूल अर्थात फळ याला तीन तोंडे असतात खरंतर इंग्रजी आठ आकाराचे त्याचे फळ असून नर आणि मादी, मध्येच कीटक असतात हा कीटकच् या नर आणि मादीचे मिलन घडवून फुलांचे रूपांतर फळात करतात, त्यामुळं यातील चिलटे अत्यंत महत्वाची आहेत. चिलटे नसतील तर उंबर झाड नाही. शिवाय पिकलेल्या उंबराची फळे खाल्ली तर आपल्याला डोळ्याचे आजार बरे होतात अशी जुनी माणसं आवर्जून सांगतात, या पिकलेल्या फळात अनेक चिलट असतात या चिलटासह फळे खावीत असेही पूर्वज आवर्जून सांगतात.
वडाची झाडं तर जगात सर्वात जास्त लांबवर पसरलेले झाड म्हणून ओळखतात, कलकत्ता येथील बॉटनिकल गार्डन मध्ये साधारणपणे साडेतीन एकरापेक्षा जास्त परिसरात एकच वडाचे झाड पसरलेले आहे, वटपौर्णिमा हा शब्द खरतर या झाडापासून निर्माण झाला, जगात वडलाच वटपौर्णिमेला महिला दोऱ्याने बांधतात. कारण त्यामुळे वडाच्या वरील फांद्या जोमाने वाढतात व पारंब्या ची वाढ खूप झपाट्याने होते या प्रक्रियेत झाड ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात सोडते आणि म्हणूनच जीवनदायी वृक्ष म्हणून याची नोंद आहे. जीवनदायी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देते आणि स्वतःची वाढ ही जोमाने होते, पारंब्या म्हणजेच वडाची मुळच ही मूळ खूप वेगाने वाढतात. म्हणून जुन्या झाडांना दोर बांधायची प्रथा आहे, हे समजून घेतले पाहिजे. घरात वडाची फांदी आणून कधीही पूजा करू नये. हा पूर्वजांचा अभ्यास आहे बर, आजच्या थोतांड अभ्यास प्रणालीचा नाही. 

नांद्रुकचे झाड हे तर घाटमाथ्यावरील अगदी सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यात हे वरदानच ठरले आहे. प्रत्येकाच्या घरी नांद्रुक पाहायला मिळते आणि नांदुरकीच्या खाली दोन बाजा टाकलेले असतात, शेजारी दहा बारा गुरांचा गोठा असतो, कोंबड्यांची डालगी असतात, शेळ्या बांधलेल्या असतात, कांदा सावलीत पोत्यात भरून टाकलेला असतो, दगडाच्या चुलीवर स्वयंपाक हि चाललेला असतो, हा सगळा संसार नांदुरकी चे झाड चालवत असतं. आपल्याला हे झाड मोठ्या प्रमाणात लावणं नितांत गरजेचे आहे. नांद्रुक म्हटलं की मला नेहमी एका ठिकाणी वीस-पंचवीस ac लावल्यासारखा वाटत, कारण सभोवताली असणाऱ्या तापमानापेक्षा जवळपास सात ते दहा अंश सेल्सिअस तापमान या झाडाखाली कमी असते हे विशेष नोंद घेण्यासारखे आहे. तसेच काहीजणांना तर या झाडाने हॉटेल व्यवसाय करणेसाठी खुप मोठे नैसर्गिक छत दिले आहे. याचा पाला गुरांना मोठ्या प्रमाणात दिला जातो. छोटी फळे आली की पक्षांना मेजवानी असते, ते नवलच.
पिंपळ, गौतम बुद्ध यांनी पहिल्यांदा बोधिसत्व प्राप्त केले ते पिंपळाच्या झाडाखाली आणि म्हणून पिंपळ जगासाठी शांतीचे प्रतीक म्हणून नोंदवलं गेलेल झाड आहे. पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असेही नाव आहे, जपानमधील लोक बुद्धांची पूजा करताना या झाडांच्या पानांची सळसळ ऐकायला एकत्रित येतात. पिंपळाची पाने खान हत्तीला खूप आवडते. भारतीय लोकही या झाडाची पूजा करतात. पिंपळ खरंतर याला मुंजा असंही गावाकडे म्हणतात. हे झाड शक्यतो कोणीही तोडत नाही सर्वांचे पुजनीय असे हे झाड मानले जाते. 
पिंपरण अर्थात हे सुद्धा खूप मोठे वाढणारे झाड असून याच्या फांद्या शेळ्या मेंढ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात, पाने आकाराने लहान असेल खोडाचा पांढरा रंग असतो.
या कुळातील बहुतेक झाडांवर अनेकदा आगी मोहोळ ची पोळी दिसून येतात कारण याच्या फांद्या मजबूत असतात यामुळे आगीमाश्या आपली पोळी बांधतात. वानर, माकड या झाडांवर रात्रभर विश्रांती घेण्यासाठी आढळून येतात. या झाडांवर अनेक पक्षांची घरटी ही आढळून येतात, यात कावळा, घारी गरुड अशी मोठ्या पक्षांची घरटी असतात. वटवाघळे ही आपल्या वसाहती या कुळातील झाडांवर करताना दिसून येतात.
या कुळातील झाडांवर भोरड्या पक्षांचे थवे येत असतात. अहो अगदी सकाळी मोठी पार्टी असते अशा झाडांवर. शिवाय उंबराला उंबरे आल्यानंतर यावर मोठी पार्टी सगळे करताना दिसतात अगदी रात्रभर वटवाघुळ आपली पार्टी करतात.
या कुळातील झाडांवर तांबट, धनेश, बुलबुल, पोपट, चष्मेवाला, सुभग, चष्मेवाला, भोरड्या, कोकिळा, शिकारी पक्षी असे नानाविध पक्षी आढळून येतात. शिवाय यावर बगळ्यांच्या वसाहती, पानकावळे, राखी बगळे, कावळे यांची घरटी आढळून येतात. परिसरात आढळणाऱ्या पक्षी, सस्तन प्राणी यांची भूक भागविण्यासाठी ही झाड मोलाची मदत करत असतात. 
पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता पिंपळ, वड, उंबर या झाडांची उपयुक्तता अतिशय महत्त्वाची असून अगदी त्याचे महत्त्व, धार्मिक भावना त्यामुळे या झाडांना मिळणार सामाजिक संरक्षण, याचा विचार करता, समाजात अनेक ठिकाणी ही झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचं असेल कारण प्रत्येक धर्माला प्रिय असणारी या कुळातील झाड आहेत. या झाडांची सावली आपल्याला आयुष्य देते अर्थात हे सगळे जीवनदायी वृक्ष आहेत, यांचे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात गाव व शहर पातळीवर झाले पाहिजे, तरच पर्यावरण संरक्षण चळवळ जागृत होईल. अलीकडे रोड शेजारी असणारी जुनी झाड तोडली जातायेत आणि छोटी परदेशी झाड लावण्याचा प्रयत्न आपलं सरकार करीत आहे. ही बाब चिंताजनक आहे. आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन सरकारला देशी झाडे लावण्यासाठी दबाव गट निर्माण केले पाहिजेत. 
डॉ महेश गायकवाड, M.Sc. Ph.D. ( Environment Science), 
पर्यावरण तज्ञ, बारामती. 
मोबाइल : 9922414822
To Top