बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मागील काही दिवसांत बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आठ गावांमध्ये १४ दिवस कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील आदेशही पारीत करण्यात आले असून स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लागू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
बारामतीत मागील काही महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक उपाययोजना राबवण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार बारामतीत कडक निर्बंध लागू करत केवळ रुग्णालये आणि औषध विक्री सुरू ठेवण्यात आली. त्याचा चांगला परिणाम होवून कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले.
सद्यस्थितीत बारामती शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तालुक्यातील काटेवाडी, सावळ, पणदरे, शिर्सुफळ, मानाजीनगर, मोरगाव, माळेगाव बुद्रूक, उंडवडी कडेपठार या आठ गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. आजपासून १४ दिवसांसाठी म्हणजेच दि. ७ जुलैपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.