सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वारसा आणि संस्कार हे शब्द मराठीत रुढ असले तरी त्याप्रमाणे आचरणात आणणारा एक जिद्दी तरुण आजच्या तरुणाईला आदर्श निर्माण करतो...त्याचं नाव रोहित राजेंद्र जगताप हा बारामती तालुक्यातील मुरुमचा...आळंदी ते पंढरपूर ही आषाढी वारी सायकलवरुन करण्याची तरुणांनी आखली खरी पण सिद्धी आणि संकल्प यात फरक असतो असे म्हणतात तसे तरुण या निर्णयापासून दूर गेले पण रोहित मात्र ठाम राहिला..कांही झाले तरी वारी करायचीच..इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे सायकलची अडचण वाणेवाडी-दत्तवाडीच्या नितीन जगताप याने दूर केली...मग काय सळसळत्या रक्ताचा रोहित आळंदीत पोहचला.इंद्रायणीत स्नान केले.माऊलीच्या चरणी संकल्प सोडला.. आणि पंढरपूरच्या दिशेने सायकलची चाके फिरु लागली.. विठ्ठलाची अनामिक ओढ मनाला अस्वस्थ करत होती.पहिला मुक्काम व जेवणाची व्यवस्था ही आळंदी,भोसरी हडपसर याठिकाणी तापकीर, शांताराम गायकवाड, वसंत टिळेकर, नासिरभाई इनामदार यांच्या परिवारासोबत झाला. मजलदरमजल करीत अवघड चढणीचा दिवेघाट ओलांडला... पावसाळ्याचे ओलेहिरवे दिवस थकव्यातही मन प्रसन्न करीत होते.मध्येच एखादा पावसाचा शिडकावा घामाने भिजलेले शरीर थंड करीत होता..घाटावरचा सुटलेला भन्नाट वारा मन प्रेरित करत होता.जणू वारीसाठी निसर्ग ही अनकुल झाला होता.होता होता सोपानकाकांच्या पुण्य नगरीत प्रवेश झाला होता.सासवड ही जशी संतांची तशी शूर विरांची नगरी.. ती सर्वांना आपलेसे करते..तिथं मुक्काम केला ती संत सोपानकाका सोहळ्याचे चोपदार सिद्धेश शिंदे यांच्या इथे.. या पुण्यनगरीचा मुक्काम मनाला सुखावून गेला.नंतर सोन्याची जेजुरी...भक्तिमय वातावरणात मनोरंजन करणारे वाघ्यामुरळी.. आणि दरवळणा दवणा,सोन्यासारखा भंडारा मनाला खुणावत होता.सह्याद्रिच्या माथ्यावर वसलेले कडेपठार आणि विराजमान झालेला दख्खनचा राजा.. मनाला भुरळ घालत होता.अभंग गुणगुणत सायकलची चाकं मार्ग आक्रमित होती...तोच वाल्मिकीच्या वाल्ह्यात प्रवेश झाला खरा पण पाप आणि पुण्य मनाला चाटून गेलं...प्रथम पाप नंतर पुण्य...देवत्वाची मोक्ष प्राप्ती हा सुखद इतिहास मनाला सुखावत होता.आता मात्र सह्याद्रीचा निरोप घेतल्यासारखा वाटत होता..ऊसाची हिरवाई गोडव्यासाठी उठून दिसत होती.ब्रिटीशाच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येत होता..पाटपाण्याने पिके आपल्याच मस्तीत डोलत होती.आगगाडीची सिट्टी वाजल्याने निरा जवळ आल्याची चाहूल लागली होती.आता पायात थकवा दाटला होता. निरा-शिवतक्रार येथे भोजन शिवाजी बाळासो चव्हाण यांच्याकडे झाला. हिरवाईतून प्रवास,सुटलेला गार वारा भक्तीरसात न्हाऊन टाकत होता..साखरेची गोडी क्षणभर जिभेवरुन तरळून गेल्याचा भास होत होता कारण समृद्ध साखरपट्टा श्रीमंतीने ऐटीत रुबाब मिरवत होता.पणदरे मुक्काम अमोल महादेव खलाटे यांच्या कडे झाला.साखरेतील गोडवा माणसांच्या नसानसात मुरला होता तो माणूसकीच्या गुणांनी जाणवत होता. जशी मोरोपंताची तशी शरदचंद्रजी पवारांची बारामती स्वत:च्या दिमाखात उभी होती..करामाई तिची पाठराखण करत होती..विकासाचे वैभव ओसांडून वाहत होते.आता मात्र सर्वत्र दूरवर बागायती क्षेत्र दिसत होते.अतृप्त मन ही तृप्त होत होतं.कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या अभंगाची अनुभूती येत होती. तर पुढे सणसरला फत्तेसिंग निंबाळकर पाटील लाखेवाडीला मोहन सानप (माजी सैनिक)
अकलूजला विजय निंबाळकर तर महाळूंगला मामांच्याकडे आनंदराव माने देशमुख,मदनसिंह माने देशमुख यांच्याकडे पाहुणचार झाला.पाऊले चालती पंढरीची वाट या गीताचा अनुभव घेत विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने मन धाव घेत होते पण सायकलच्या प्रवासाने शरीर तात्काळ पोहचू शकत नव्हते...सायकलचा वेग मंदावत होता.थकवाही आल्यासारखा वाटत होता...एकदाचा पंढरपूरात पोहचलो.चंद्रभागेत स्नान केले.पुंडलिकाला हात जोडले.
संत चोखोबा,संत नामदेव पायरीचे दर्शन घेतले.विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृतार्थ झाल्याचे समाधान वाटले.क्षणभर विसावलो...डोळे झाकले...विठ्ठलमय झाल्याचा भास झाला.सायकलची आळंदी-पंढरपूर वारी सफल झाली..मनात आले तर पंढरपुरात येता येते.कशाला हवा पालखी सोहळा..होऊन गेलेले संत कांही पालखी सोहळ्याची वाट पाहत नव्हते..भाव तेथ देव...या प्रमाणे देवाची आषाढी वारी सफल झाली होती..आईने कुशीत घ्यावे किंवा वडिलांच्या गळ्याला करपाशाने आवळावे तसा विठ्ठलाचा सहवास मनाला कांहीतरी भासून गेला...मनाची शांती,तृप्तता ओसांडून वाहत होती..भक्ती आणि परिश्रम या डोहात न्हाऊन निघालो होतो...संत संस्कृती प्रमाणे मानवतेचे विचार घेऊन प्रपंचात रमण्यासाठी परतीच्या प्रवासाला घराच्या ओढीने पावलं वळली होती.