श्रीगोंदा : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
स्विच ऑफ असलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने नगरसेविकेचे पती जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी श्रीगोंदा येथे ही घटना घडली. प्रशांत गोरे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी सीमा गोरे या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.
गोरे यांच्या पँटच्या खिशातील एका कंपनीचा मोबाईल होता.अचानक त्याचा स्फोट झाला. यात गोरे यांच्या पायाला दोन ठिकाणी भाजले आहे. सुदैवाने गोरे यांना जास्त दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईल स्विच ऑफ होता तरीही पेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
खिशातच घेतला पेट
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रशांत गोरे हे पेडगाव रस्त्यावर एका व्यक्तीशी बोलत उभे होते. अचानक त्यांच्या पँटच्या खिशातील मोबाईल अचानक स्फोट झाला. खिशातील मोबाईलने पेट घेतला, परंतु गोरे यांनी समयसूचकता दाखवल्यामुळे त्यांना जास्त दुखापत झाली नाही. स्फोटाच्या आवाजाने बाजूचे लोक धावत मदतीला आले. त्यानंतर गोरे यांनी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले आहेत.