विस्तारीकरणाचेही काम युद्धपातळीवर सुरु - पुरुषोत्तम जगताप : सोमेश्वर कारखान्यात रोलर पुजन संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

सोमेश्वरनगर (ता.बारामती) येथील श्री सोमेश्वर सहकारी साखरकारखान्याचा रोलर पुजन समारंभ कोरोना प्रादुर्भावाच्या सर्व नियमांचे पालन करीत आज रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक किशोर भोसले यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप संचालक लालासाहेब माळशिकारे, सचिन खलाटे, मोहन जगताप सभासद राजेंद्र धुमाळ, कार्यकारी संचालक आर.एन.यादव, अधिकारी व कामगारांच्या उपस्थित संपन्न झाला. रोलर पुजन समारंभावेळी बोलताना श्री सोगेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष .पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, गतवर्षीप्रमाणेच येणारा हंगाम सुरळीत व चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी कारखान्यातील अंतर्गत दुरुस्त काम प्रगतीपथावर सुरु असुन शासनाची परवानगी मिळताच आपला हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुरु असल्याचे .जगताप यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे विस्तारीकरणाचेही काम युद्ध पातळीवर सुरु असुन सदर विस्तारीकरणाचे काम डिसेंबर अखेर पुर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.जगताप पुढे म्हणाले की, येणा-या हंगामासाठी कारखान्याकडे ३८ हजार एकराची ऊसनोंद झाली असुन यामधुन अंदाजे जवळपास १५ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असुन या संपुर्ण ऊसाचे गाळप कसे करता येईल यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे. कारखान्याकडे तोडणी वाहतुक यंत्रणेचे करारही पुर्ण झाले असुन ३५० ट्रक ट्रॅक्टर, ९५० बैलगाडी, २०० डंपीग ट्रॅक्टर तर १३ हार्वेस्टरचे करार कारखान्याने केले असुन ही संपुर्ण तोडणी वाहतुकयंत्रणा येणा-या हंगामासाठी उपलब्ध होणार आहे.
          जगताप पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची उत्तम प्रगती सुरु असुन येणा-या हंगामातही आपण सर्वच बाबततीत अग्रेसर राहु असा आंम्हा संचालक मंडळास विश्वास आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक के डी.निकम यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक आर.एन. यादव यांनी मानले.
To Top