नीरा : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
नीरा (ता.पुरंदर) येथे शुक्रवार दि. १६ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कुख्यात गुंड गणेश रासकर याच्यावर त्याचाच जोडीदार गौरव लकडे याने गोळीबार करत खुन केला होता. आरोपी लकडेला साथ देणाऱ्या तीघांना पोलीसांनी ३६ तासांच्या आत अटक केली होती. परंतू प्रत्यक्ष गोळीबार करणारा मुख्यआरोपी गौरव लकडे तब्बल दहा दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. फलटण तालुक्यातील मिरेवाडीतील शिवारात उसामध्ये लपून बसला असल्याची माहिती जेजुरीचे पोलीस नाईक धर्मवीर खांडे यांना मिळाली आणि जेजुरी पोलिसांनी सोमवार दि.२६ रोजी रात्री दहाच्या सुमारास उसाच्या शेताला चोहो बाजूने घेराव करत गौरव लकडेच्या मुसक्या आवळल्या.
जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी नीरा येथे पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार नीरा शहरातील पुणे - पंढरपूर पालखी मार्गावर दि.१६ जुलै रोजी सायंकाळी येथील कुख्यात गुंड गणेश रासकर याचा खून एकेकाळी त्याचाच साथीदार असणारा गौरव लकडे याने त्याचा साथीदार निखिल ढावरे सोबत रासकर यांच्या डोक्यात व जबड्यावर अत्यंत जवळून गोळीबार करून खुन केला होत. हा गुन्हा घडल्यानंतर ३६ तासात निखिल ढावरे तसेच कटामध्ये सामील असणारा गणेश जाधव व आरोपीला पिस्तूल व काडतूस विकणारा संकेत उर्फ गोटया सुरेश कदम यांना पोलिसांनी अटक केली होती.
तीघांच्या अटकेनंतरही मुख्य आरोपी गौरव लकडे पोलिसांना गुंगारा देत होता. या आरोपीसाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली होती. परंतु तो पोलिसांना मिळत नव्हता या आरोपीसाठी पोलिसांनी सातारा, सांगली, पंढरपूर या ठिकाणी शोध घेतला होता. परंतू लकडे हा गुन्हा केल्यापासून लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील त्याच्या मिरेवाडी (ता.फलटण) गावातील शिवारात उसामध्ये लपून बसला होता. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धर्मवीर खांडे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी लकडे उसाच्या शेतामध्ये आहे.
सोमवार (दि.२६) रोजी रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव कुतवळ, पोलीस हवालदार विठ्ठल कदम, पोलीस नाईक धर्मवीर खांडे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, संदीप मोकाशी तसेच नीरा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार, नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, निलेश जाधव, पोलीस शिपाई प्रवीण शेंडे, चालक पोलीस शिपाई भानुदास सरक, संजय धामाल यांनी मिरेवडीतील उसाला चोहो बाजूने घेराव करून, मुख्य आरोपी गौरव जगन्नाथ लकडे (वय २४) राहणार मिरेवाडी (ता. फलटण) याला ताब्यात घेतले. ही धडक कामगिरी पुणे ग्रामीण अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.