पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे राज्यातील झिका विषाणू बाधित पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता केंद्रीय पथक आज दि.५ ऑगस्ट रोजी बेलसरला भेट देत आहे. बेलसर येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हे पथक दहा वाजण्याच्या सुमारास बेलसर मध्ये दाखल झाले आहे. बेलसर मध्ये झिकाचा रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यातील झीका चा हा पहिलाच रूग्ण असल्यामुळे केंद्रीय पथकामार्फत सुद्धा या परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. या संदर्भात काही उपाययोजना करण्यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहे.
जिल्हा व तालुका आरोग्य प्रशासनाने केलेल्या उपाययोजना संदर्भात ते माहिती घेणार आहेत. काल बुधवारी पुणे येथे या पथकाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य संचालक अर्चना पाटील, आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप अवट, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवाण पवार तसेच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून या उपाय योजनांची माहिती घेतली. तालुका आरोग्य प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आज गुरवारी बेलसर गावात पाहणी करून हे पथक झिका नियंत्रना संदर्भात आरोग्य प्रशासनाला मार्गदर्शन करणार आहे. तसेच या बाबतचा अहवाल केंद्राकडे सादर करणार आहे. आज ही टीम काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.