सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सांगवी : प्रतिनिधी
कृषी पंपासह सर्वच वर्गवारीतील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीजजोड तोडण्याच्या आदेशा नंतर सांगवी, शिरवली,खांडज,कांबळेश्वर येथील विद्युत वीजजोड तोडण्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरण कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बारामती परिसरात पाठ फिरवली आहे.परिणामी खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक पाण्या अभावी जळून चालले आहे.उसाची पिके देखील आता जळण्याच्या मार्गावर आहेत. सुदैवाने धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला चांगल्या प्रकारे पाणीसाठा आहे. परंतु शेतकऱ्यांची थकबाकी असल्याने ट्रान्स्फॉर्मर सोडवल्यामुळे पाणी असून ही शेतकरी हतबल झाले आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगवी येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत वाद घातला.सरकारने जाहिर केलेली कृषी संजीवनी योजनेत शेतकरी सहभागी होण्यास तयार आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मुदत मार्च २०२२ आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची गंभीर परिस्थीती असल्यामुळे विद्युत अधिकारी यांना अपेक्षित असलेली थकीत रक्कम देण्यासाठी शेतकरी असमर्थ आहेत. यामुळे उसाची तोडणी होई पर्यंत,किंवा सोयाबीनचे पीक निघे पर्यंत महावितरणने मुदतवाढ द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे आम्ही मुदत वाढ देण्यासाठी असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या शाब्दिक संघर्ष झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. परंतु शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. जर यापुढे देखील विद्युत वीजजोड तोडची भूमिका अशीच राहिली तर उग्र आंदोलन,रास्ता रोको व उपोषण या मार्गाचा अवलंब करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल तावरे,हनुमंत तावरे,दत्तात्रय तावरे,विरेंद्र तावरे,दत्तोबा ढाकाळकर,अरविंद तावरे,विठ्ठल फडतरे,विराज खलाटे,धनंजय खलाटे,इंद्रसेन आटोळे यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.