सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
कोतवालांना चतुर्थ श्रेणी , समान काम समान वेतन या धर्तीवर पंधरा हजार मानधन मिळावे , महसूल खात्यात शिपाई पदासाठी जागा राखीव असाव्यात , कोतवालाना तलाठी पदासाठी पन्नासटक्के आरक्षण आदी मागण्यासाठी राज्य कोतवाल संघटनेचे शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले .
ग्राम पातळीवर कोतवाल हा महसूल व शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा समजला जातो . स्वातंत्र्यांनंतरही कोतवालांचे प्रश्न जैसे थे अवस्थेत आहेत . यामुळे कोतवालांच्या विविध मागण्यासाठी राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष शिवप्रसाद देवणे , राज्य सचिव कृष्णा शिंदे , औरंगाबाद विभाग कोतवाल संघटना अध्यक्ष सोमनाथ गवळी ,लातुर जिल्हाध्यक्ष अंबादास यामजले , पुणे जिल्हा कोतवाल संघटक विजय भोसले , बारामती तालुकाध्यक्ष संतोष खोमणे , शेखर खंडाळे , महीला प्रतीनिधी पंचाली जगताप , अण्णा शिंगाडे , किरण सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
यावेळी वरील मागण्यांसह कोरोना काळात मृत पावलेल्या कोतवालांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी , चतुर्थ श्रेणीचा प्रश्न लवकर मार्गी लागावा या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या .यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांना पवार यांनी कोतवालांचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे .यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.