सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे येणाऱ्या हंगामात १४ लाख मे.टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. ३८ हजार एकर नोंदीचा ऊस तर ५ हजार एकर बिगरनोंदीचा असा एकूण ४३ हजार एकर ऊस उपलब्ध आहे. सभासदांच्या नोंदींचा संपूर्ण ऊस गाळप करण्यात येणार आहे. एक लाख आडसाली ऊस अन्य कारखान्याला देणार आहोत. सोमेश्वर या हंगामात १६ ते १७ लाख क्विंटल साखर तयार करणार आहे. राज्य सरकारने १५ ऑक्टोबर पासून गाळप हंगामास परवानगी दिल्याने हंगामाची तयारी पूर्ण झाली असून सभासद, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्याने हंगाम यशस्वी पार पाडू असा विश्वास सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आणि उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी व्यक्त केला. सोमेश्वर कारखान्याच्या जुन्या मिलचा रोलर पूजन कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी(दि. १७) रोजी पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संचालक किशोर भोसले, सुनिल भगत, लालासाहेब माळशिकारे, लालासाहेब नलवडे, विशाल गायकवाड, उत्तम धुमाळ, हिराबाई वायाळ, ऋतुजा धुमाळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम वेगात सुरू असून हा प्रकल्प जानेवारीत पूर्ण होईल. त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता ८ हजार मे.टन होणार असल्याने सभासदांच्या ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण होणार आहे. पुढील हंगामात दोन टप्यात ५ लाख क्विंटल साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला असून राज्यात उच्चांकी दर देण्याची परंपरा यापुढील काळातही कायम ठेवू असा विश्वास यादव यांनी यावेळी व्यक्त केला. बी हेवी पासून ५० लाख लिटर इथेनॉल तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
................
येणाऱ्या हंगामासाठी तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज असून सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या संपूर्ण ऊसाच्या गाळपास प्राधान्य देणार आहोत. गाळपासाठी कारखान्याकडे १३ हार्वेस्टर , ११०० बैलगाडी व ३५० ट्रक- ट्रक्टर आदींच्या माध्यमातून ऊसाचे गाळप करणार आहोत.
शैलेश रासकर - उपाध्यक्ष सोमेश्वर कारखाना.