मोरगाव ता. बारामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पैसे घेऊन वशिला वाल्यांना कोव्हीड प्रतीबंध लसीकरण केले जात आहे. यामुळे तासनतास रांगेत थांबणाऱ्या ग्रामस्थांना लस न घेता रिकाम्या हाताने परतावे लागत आहे . याबाबत वरीष्ठांनी दखल घेन्याची मागणी निवेदनाद्वारे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन यादव यांनी केली आहे.
मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत कोरोना प्रतिबंध लसीकरण सुरू आहे. अनेक ग्रामस्थ व नवतरुण रोजगार बुडवून लसीकरणासाठी स्वयंस्फूर्तीने तासनतास रांगेमध्ये थांबत आहेत. या रांगेमध्ये थांबलेल्या लोकांना टोकन दिले जात आहे. मात्र विना टोकनवाल्या ओळखीच्या व वशील्याच्या लोकांना लसीकरण येथील आरोग्य केंद्रामार्फत केले जात आहेत.
तसेच लसीकरणादिवशी तात्काळ लस संपल्याचा देखावा करून दुपारच्या सत्रानंतर मोबाईलद्वारे अनेक लोकांना लसीकरणासाठी बोलावले जात असल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांचे आहेत .येथील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पैसे घेऊन लसीकरण केले जात असल्याचे आरोपही सचीन यादव केलेला आहे .
..................................................
याबाबत मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता पैसे घेऊन लसीकरण आरोग्य केंद्रामार्फत आम्ही करीत नसून केलेले आरोप हे खोडसाळ बुद्धीने केलेले आहेत . कोरोना प्रतीबंध लस ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. तसेच हे सर्व आरोप आम्ही नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले.