सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शेतकरी व कामगारांच्या विरोधी केंद्र शासनाने कायदे केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत तसेच साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमेश्वर कारखान्याच्या कामगारांच्या वतीने मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेध सभा पार पडली. या सभेत कामगार व शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली.
माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या विरोधी कायदे केले आहेत ते कायदे रद्द करुन शेतकरी व कामगारांशी चर्चा करून त्यांच्या हिताचे कायदे करावेत. कैलास जगताप यांनी सांगितले की, गेल्या १० महिन्यांपासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी ऊण, वारा, पाऊस व थंडीची पर्वा न करता शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळविण्यासाठी आंदोलन करीत आहेत. सुमारे ६०० शेतकरी शहीद झाले तरीही केंद्रशासन दखल घेत नाही. कामगारांना नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षितता राहीली नाही. हंगामी कामगारांचे रिटेन्शन भत्ते रद्द करून कामगारांना नोकरीवरुन काढून टाकण्याचा तसेच कंपनी कोणतीही नोटीस न देता बंद करण्याचा उद्योगपती धार्जिने कायदा केंद्राने केला आहे तो रद्द करण्याची मागणी कामगारांनी केली. यावेळी सोमेश्वर कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, पदाधिकारी संतोष भोसले, राहुल सोरटे, श्रीकांत जगताप, भाऊसाहेब शेंडकर, धनंजय निकम, बाळासाहेब लकडे उपस्थित होते.