बारामती ! निंबुतच्या लेकीची खेडशिवापूर येथे आत्महत्या : पती विरुद्ध गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
खेडशिवापूर : प्रतिनिधी
सहा वर्षांपूर्वी लग्न झालेल्या आपल्या मुलीने केलेल्या मागणीवरून शेतजमीन विकून 25 लाख रुपये देऊनही जावई व मुलीच्या सासू-सासऱ्यांनी पैशासाठी मुलीचा छळ केल्याने मुलीने आत्महत्या केली. अशी फिर्याद निंबुत येथील शिवदत्त प्रतापसिंह काकडे यांनी राजगड पोलिसांकडे दिली. त्यावरून राजगड पोलिसांनी सुधीर विठ्ठल कोंडे या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
          याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, निंबुत येथील शिवदत्त प्रतापसिंग काकडे यांची मुलगी सुषमा हिचा विवाह खेड-शिवापूर येथील सुधीर विठ्ठल कोंडे यांच्याशी 19 फेब्रुवारी 2014 मध्ये झाला होता. त्यावेळी लग्नामध्ये सहा तोळे सोन्याचे दागिने मागणीवरून घातले होते. त्यानंतर 2016 मध्ये मुलगी सुषमा हिने पती सुधीर हा त्याच्या मित्रांसह काही ठिकाणी जमिनीचे प्लॉटिंग करत असल्याने पैसे मागत असल्याची माहिती दिली. त्यावरून शिवदत्त काकडे यांनी त्यांची शेतजमीन विकून 15 लाख रुपये व इतर नातेवाईकांकडून दहा लाख रुपये असे 25 लाख रुपये दिले. मात्र त्यानंतरही आणखी पैशाची मागणी करत सुधीर कोंडे याने सुषमा हिचा छळ केला. त्यावरून सुषमा हिने पंधरा दिवसापूर्वी सत्यशील काकडे यांच्या मोबाईलवर फोन करून शिवदत्त यांच्याशी संपर्क साधला. तुम्ही दिलेले पैसे लवकरात लवकर मागून घ्या अथवा खेड-शिवापूर येथील महामार्गालगत दहा गुंठे जागा नावावर करून घ्या आणि मला इथून घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर तिची समजूत घालण्यात आली. मात्र 5 सप्टेंबर 2021 रोजी साडेनऊ वाजता सुषमा हिच्या दिराने शिवदत्त काकडे यांना फोन करून सुषमा हिने गळफास घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर सुषमा हिला ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.. त्यावरून वडील शिवदत्त काकडे यांनी राजगड पोलिसांकडे आपल्या मुलीने पती सुधीर कोंडे यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद दिली. त्यावरून राजगड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
To Top