सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
खंडाळा : प्रतिनिधी
कारखाना सर्वसामान्य जनतेच्या पैशातून उभा राहिला . पण कारखाना कारभारात केवळ शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली . उभारणीला जेवढ पैसे लागले त्याच्या दुप्पट कर्ज झाले मग सत्ताधाऱ्यांनी केलं काय ? सत्ताधाऱ्यांना काही करता आले नाही त्यामुळे भावनेने लोकांना वेगळ्या वळणावर न्यायला लागले आहेत. आता गावोगावी ते रडण्याचा कांगावा करतील , नाटक करतील . पण त्यांच्या ढोंगीपणाला भूलू नका . शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारून मनमानी कारभाराने कारखान्याचे वाटोळे केले असल्याचा आरोप आमदार मकरंद पाटील यांनी केला .
खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखाना निवडणुकीसाठी शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलच्या प्रचार सभेचे ते बोलत होते . यावेळी जि.प अध्यक्ष उदय कबुले , सभापती राजेंद्र तांबे , जिल्हा बॅकेचे संचालक दत्तानाना ढमाळ , बकाजीराव पाटील , उपसभापती वंदना धायगुडे , जि.प. सदस्य मनोज पवार , दिपाली साळुंखे , विश्वनाथ पवार , माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे , शामराव गाढवे , एस. वाय. पवार, रमेश धायगुडे , चंद्रकांत ढमाळ यासह प्रमुख उपस्थित होते.
पाटील म्हणाले , सत्ताधाऱ्यांना कारखाना चालविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी भावनिकतेचा बांध फुटला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी व कारखान्याला उर्जीतावस्था देण्यासाठीच निवडणूक लढवत आहोत. किसनवीर कारखाना युनीटवर एक हजार पंधरा कोटीचे कर्ज असून किसनवीरच्या नेतृत्वाने आता राजकिय संन्यास घेण्याची वेळ आली आहे. खंडाळा कारखान्याच्या माध्यमातुन सत्ताधारी मंडळीनी मोठा भ्रष्टाचार केला असुन त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. खंडाळा कारखाना सुरळीत चालु ठेवण्यासाठी सभासदांनी परिवर्तनाच्या हाकेला साथ द्यावी.
नितीन भरगुडे म्हणाले ,आ. मकरंद पाटील यांच्यामुळेच आजवर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तो खंडाळा तालुक्यातील जनतेचा रहावा यासाठी हि निवडणुक लढवली जातेय. सत्ताधारी पक्षाला स्व. यशवंतराव चव्हाण व किसन वीर यांच्या विचारांचा विसर पडला असुन कमळाच्या प्रेमात पडले आहेत. कारखाना वाई तालुक्यातील नेत्यांच्या दावणीला बांधण्याचे पाप शंकरराव गाढवे यांनीच केले आहे. खंडाळा तालुक्याचा स्वाभिमान जागृत ठेवा आणि आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी शेतकरी सभासदांनी परिवर्तन पॅनेलला साथ द्यावी.
प्रास्ताविक मनोज पवार यांनी केले तर अजय भोसले यांनी आभार मानले.