सोमेश्वर रिपोर्टर टीम------ -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचेकडून ऊस तोडणी करताना, ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतक-यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतक-यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालक यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असेल तर अश्या ऊस तोडणी मुकादमा वर कारवाई करावी असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.
याबाबत काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, राज्यात चालू 2021-22 गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता असल्याने व इथनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतक-यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचे संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे. उसतोडी बाबत शेतक-यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन / व्हॉटसॅप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतक यांना होणेकरिता प्रसिद्धी द्यावी. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर / मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येते की, अशा स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करणेसाठी कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिका-यांची नेमणूक करावी. सदर तक्रार निवारण अधिकारी यांचे नाव, संपर्क मोबाईल नंबर यांची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करावी. शेतक-यांनी लेखी स्वरूपात अशी तक्रार साखर कारखान्याच्या शेती अधिकारी यांचेकडे घटना घडल्यावर लगेच करावी. तसेच तक्रार करण्यासाठी शेतक-यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये मजूर / मुकादम / वाहतूकदार यांचे नाव व वाहन क्रमांक नमुद करावा.
तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर / मुकादम / वाहतूकदार यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर चौकशी करून तक्रारीचे वेळीच निराकरण करावे. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम मजूर / मुकादम / वाहतूक कंत्राटदार यांचे बिलातून वसूल करून संबंधीत शेतक-यास अदा करावी. याची जबाबदारी तक्रार निवारण अधिकारी यांचेवर सोपवावी.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर / मुकादम / वाहतूकदार यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही याची कार्यकारी संचालक व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर / मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.