बारामती ! तरडोलीचे सरपंच नवनाथ जगदाळे यांची निवड अवैध : जिल्हाधिकारी यांचा आदेश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
तरडोली ता .बारामती येथील ग्रामपंचायत सार्व निवडणूकीनंतर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेली नवनाथ जयसिंग जगदाळे  यांची सरपंच निवड जिल्हाधीकाऱ्यांनी अवैध ठरवली आहे . सरपंच गुप्त मतदान निवड पद्धतीत  निवडणूक निर्णय अधीकारी  यांनी वैध  ठरणारे मतदान अवैध ठरविल्याने प्रत्यक्ष निकालामध्ये बदल शक्य झाला असता व   दोन्ही उमेदवारास समसमान मते पडली असती असा निष्कर्ष काढून  जिल्हाधीकारी राजेश देशमुख यांनी सरपंच निवड प्रक्रीयेचे कामकाज रद्द ठरविले आहे .

तरडोली ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सरपंच व उपसरपंच पदाची निवड कार्यक्रमासाठी  दि .  २५ फेब्रुवारी २०२१ रोजी  संपन्न झाला . यामध्ये सरपंच पदासाठी नवनाथ जयसिंग जगदाळे , विद्या हनुमंत भापकर यांनी अर्ज केला होता  . तर उपसरपंच पदासाठी सागर पंडीत  जाधव व महेंद्र जिजाबा तांबे यांनी अर्ज केला होता . उपसरपंच  पदासाठी दोघांसाठी समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीनुसार महेंद्र तांबे यांची निवड करण्यात आली होती .

सरपंच पदाच्या गुप्त मतदान पध्दतीत नऊ सदस्यांच्या  मतदानापैकी  नवनाथ जगदाळे यांना चार मते पडली होती . दुसऱ्या उमेदवार  विद्या हनुमंत भापकर यांना तीन मते पडली होती . तर एका सदस्याने गुप्त मतदान अर्जावर सही केल्याने तर दुसऱ्या सदस्याने  सरपंच पदासाठी पात्र  उमेदवाराच्या नावापुढे करावयाची खुण उलटी केल्याने  या दोघांची मते बाद ठरवली होती . यामुळे विद्या हनुमंत भापकर ,  संतोष संपत चौधरी , नबाबाई सोमनाथ धायगुडे , स्वाती सतीश गायकवाड , महेंद्र जिजाबा तांबे यांनी  पुणे जिल्हाधीकारी राजेश देशमुख यांकडे  सरपंच निवड प्रक्रीया रद्दबातल होण्यासाठी अर्ज केला होता .

यानुसार विद्या भापकर यांचे वकील   हेमंत भांड , हेमंत बंड यांनी  मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील यापूर्वीच्या   आदेशामध्ये नमूद केलेल्या निष्कर्षानुसार    मतपत्रीकेवर केलेल्या चिन्हामुळे त्या मतदाराला कोणाला मत देयचे हे स्पष्ट झाल्यास असे मत बाद न करता त्या उमेदवाराला  मिळाले हे मान्य करावे  असा युक्तीवाद केला होता . यानुसार  जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी  हा युक्तीवाद ग्राह्य धरून  एका मतदाराचे मतदान चुकीच्या पद्धतीने बाद ठरविल्याने  सरपंच निवड  प्रत्यक्ष निकालामध्ये बदल शक्य झाला असता व नवनाथ जगदाळे यांना चार मते तर विद्या  भापकर  यांना  चार मते पडली असती असा निष्कर्ष काढला  असून दि २५  फेब्रुवारीची  सरपंच पदाची  झालेली निवड रद्दबातल ठरवली आहे .
To Top