सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे – डबल मोक्क्यातील आरोपी नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याची येरवडा कारागृहात रवानगी झाल्यानंतरदेखील त्याचे काळे धंदे थांबेनात. सध्या अटकेत असलेला गणेश गायकवाड हा रात्री बेरात्री सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असल्याचे दोन तक्रारदारांना निदर्शनास आले. ऐवढेच नव्हे तर गणेशने फिर्यादीलाच फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली आहे. त्यामुळे फिर्यादी महेश काटे यांनी रितसर याप्रकरणाचा तक्रार अर्ज पोलीसांना केला असून पोलीस तपास करत आहेत.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सदर आरोपींनी याआधी वेगवेगळ्या व्यक्तींमार्फत मला व माझ्या कुटुंबीयांना संपर्क साधून बेकायदेशीर प्रलोभने, गर्भित धमक्या देऊन, दबाव टाकून सदर गुन्हे मागे घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सदर प्रयत्न होत असताना मी व माझ्या कुटुंबीयांनी वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत. तरीदेखील सदर आरोपी हे अटकेत असूनही मला फेसबुकमार्फत संपर्क साधत असल्यामुळे व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत असल्याचे माझ्या निदर्शनास आल्यामुळे माझ्या मनात भीती निर्माण झालेली असून दडपण आलेले आहे. आरोपी हे वेगवेगळ्या मार्गांनी कटकारस्थान रचून मला बेकायदेशीरपणे कुठल्यातरी प्रकरणामध्ये अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक व राजकीयदृष्ट्या सदर आरोपी हे अतिबलाढ्य असून ते आम्ही दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी व आमच्यावर सूड उगविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊन आम्हाला खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवू शकतात अथवा आमच्या जीवीताला धोका निर्माण करू शकतात.
मुख्य आरोपी नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ भाऊ तसेच मुलगा गणेश गायकवाडसह त्याच्या साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, अवैध सावकारी आणि बळजबरीने जमिनी हडप करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणीपद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.
COMMENTS