सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील गावांची वाढलेली संख्या गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण आणि एकूणच कायदा-सुव्यवस्था वरील ताण लक्षात घेता सुपे पोलीस दूर क्षेत्राचे आता सुपे पोलीस ठाण्यामध्ये लवकरच रूपांतर करण्यात येणार आहे. या संदर्भातील अध्यादेश गृहखात्याने नुकताच जारी केला आहे.
आतापर्यंत सुपे येथील पोलिस दूरक्षेत्र वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत होते. मात्र यापुढे आता ते सुपे पोलीस ठाणे असणार आहे. या पोलीस ठाण्यासाठी एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन फौजदार, पाच सहाय्यक फौजदार, दहा पोलीस हवालदार, पंधरा पोलीस नाईक व २० पोलीस शिपायांची नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
या पोलिस ठाण्यासाठी तब्बल ३५ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे साहित्य मिळणार असून, यामध्ये तीन वाहने व तीन दुचाकी यांसह कार्यालयीन साहित्याचा समावेश आहे. सुपे पोलिस ठाण्याची निर्मिती शासनाने केल्याने परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या गुन्ह्यांसाठी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याकडे जावे लागत होते. तो हेलपाटा आता वाचणार असून, परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व कायदा सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. सुपे परिसराचा कायापालट होत असुन सिनियर कॉलेजची नवीन इमारत पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तर सुप्याच्या पश्चिम भागात विमानतळ होत असल्याची चर्चा होत असल्याने या पोलिस ठाण्यास अधिकचे महत्व प्राप्त होणार आहे. मात्र मागिल काही महिण्यांपासुन सुरु असलेल्या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे कामकाज संतगतीने सुरु असुन याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
......................................