पुणे, दि. २४:
महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अपूर्ण घरकूलांची कामे पूर्ण करावीत आणि मंजूर घरकूलांची कामे त्वरीत सुरू करावी, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयातून महाआवास अभियानाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस उपायुक्त विजय मुळीक, राज्य कक्षाचे उपसंचालक नितीन काळे, सहायक आयुक्त डॉ. सीमा जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. रामोड म्हणाले, गरजूंना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी 20 नोव्हेंबरपासून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात करण्यात आली आहे. शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांच्या कामांना गती देण्यासाठी आणि क्षेत्रीय यंत्रणांच्या समस्या दूर करण्यासाठी अभियानाबाबत कार्यशाळेचे विविध स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत लाभार्थ्यांना घरकूल बांधण्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. ग्रामसभा घेऊन प्रतिक्षा यादी त्वरीत अंतिम करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा स्तरावरदेखील ‘डेमो हाऊस’ बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुणे विभागाने चांगली कामगिरी केल्याचे सांगून दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा डॉ. रामोड यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात मुळीक यांनी सादरीकरणाद्वारे अभियानातील विविध उपक्रमांची माहिती दिली. अभियान राबविताना मनरेगा आणि घरकूल योजना कक्षाचा परस्पर समन्वय ठेवून अभियानाला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. काळे यांनीदेखील अभियानाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते
COMMENTS