सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कामगार सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून रविवार (दि.१२) डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आल्यानंतर ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप यांच्या नेतृत्वाखाली श्री सोमेश्वर कामगार परिवर्तन पॅनेल आणि कामगार संचालक बाळासाहेब काकडे व बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली श्री सोमेश्वर कामगार विकास पॅनेल मध्ये अटीतटीची निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारण जागेसाठी १०, इतर मार्गास प्रवर्ग १, भटक्या विमुक्त जाती जमाती १ आणि अनुसूचित जाती प्रतिनिधी १ अशा १३ जांगासाठी एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एक अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे तर अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी तुकाराम जगताप यांच्या परिवर्तन पॅनेला पाठिंबा जाहीर केला आहे. १५ जागा असलेल्या पतपेढीत दोन महिला प्रतिनिधी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
५३७ मतदार संख्या असलेले कामगार १२ डिसेंबरला आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. नव्याने समाविष्ट झालेले मतदार यांचे मतदान निर्णायक ठरणार असल्याने ते आपले मत कोणत्या पॅनेलच्या पारड्यात टाकतात हे येत्या १२ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.
सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र जागा वाटपावरुन ताळमेळ बसला नाही त्यामुळे निवडणूक जाहीर होत ती आता चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीचे सहाय्यक निंबधक कार्यालयाचे अधिकारी आर. ए. देवकाते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
COMMENTS