सोमेश्वर रिपोर्टर टीम------
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने व्याजासह एकरक्कमी FRP सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग न केल्याने माजी खासदार राजु शेट्टी यांच्या समवेत लवकरच काटा बंद आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिली.
काकडे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हणटले आहे की, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर, ता.बारामती, जि.पुणे या कारखान्याचा सन २०२१-२२ चा गाळप हंगाम सुरू होवुन दिड महिना झालेला आहे. कायद्या प्रमाणे गाळप झालेल्या उसाला F.R.P रक्कम पुर्ण देणे बंधनकारक आहे. असे असतानाही कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने अद्यापपर्यंत एकरक्कमी F.R.P रक्कम देणे संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
वास्तविक १४ दिवसांच्या आत F.R.P रक्कम देणे बंधनकारक असताना कारखाना प्रशासन सभासदांना वेठीस धरत आहे. शेतकरी कृती समितीने F.R.P रक्कम एकरक्कमी विनाकपात दि. ३०/११/२०२१ पर्यंत सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. याबाबत यापुर्वीच दि.८/११/२०२१ व दि.२७/११/२०२१ रोजी दोन वेळा पत्र व्यवहार करून विनंती केली होती. व F.R.P रक्कम एकरक्कमी दि.३०/११/२०२१ पर्यंत सभासदांच्या खात्यावर वर्ग न केल्यास नाईलाजास्तव काटाबंद आंदोलन करावे लागेल असा इशाराही दिला होता. परंतु आज २ तारीख आली तरी कारखान्याने सभासदांच्या बँक खात्यावर व्याजासह एकरक्कमी F.R.P रक्कम वर्ग केलेली नाही.
तसेच कारखान्याच्या नविन संचालक मंडळाच्या पहिल्या मिटींगमध्ये एकरक्कमी F.R.P बाबत सकारात्मक चर्चा होवुन निर्णय होईल म्हणुन शेतकरी कृती समितीने सुध्दा चेअरमन व संचालक मंडळास संधी दिली होती. परंतु आज दिड महिना झाला, गेल्या आठवड्यातही संचालक मंडळाची मिटींग झाली. तरी चेअरमन एकरक्कमी F.R.P बाबत भ्र शब्द ही काढायला तयार नाहीत. व आम्हीही त्यांना ३० तारखे पर्यंत मुदत दिली होती. परंतु संचालक मंडळाची एकरक्कमी F.R.P देण्याची मानसिकता नसल्यामुळे आता शेतकरी कृती समिती व्याजा सकटच एकरक्कमी F.R.P घेवून सभासदांना न्याय मिळवून देणार आहे. ३० तारखेच्या आत जर कारखान्याने एकरक्कमी F.R.P रक्कम सभासदांच्या बँक खात्यात वर्ग केले असती तर कृती समितीने व्याजाच्या रक्कमेची मागणी केली नसती. फलटण तालुक्यातील श्रीराम कारखाना अडचणी असतानाही चालु गळीत हंगामात एकरक्कमी F.R.P सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असेल तर आपला कारखाना एवढा सक्षम असुनही एकरक्कमी F.R.P रक्कम सभासदांना का देवु शकत नाही .
पुणे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी सुध्दा एकरक्कमी F.R.P वेळेत न देण्याचा प्रयत्न
चालविलेला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव माजी खासदार राजू शेट्टी यांचे समवेत कारखान्याचा चालु
गळीत हंगामाचा काटा बंद करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास चेअरमन व कार्यकारी संचालक जबाबदार राहतील याची गांभीर्याने नोंद
घ्यावी. तसेच वेळपडल्यास ज्या कारखान्यांनी एकरक्कमी F.R.P दिलेली नसेल त्या कारखान्यांवर
सुध्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षते खाली तेथेही
काटा बंद आंदोलनास जाणार आहोत.
तसेच सोमेश्वर कारखान्यामध्ये मा.ना. अजितदादा यांच्या नावाखाली गेली बरेच वर्ष चेअरमन यांनी जो मनमानी कारभार चालविलेला आहे, चुकीच्या पध्दतीने घेतलेल्या निर्णयांमुळे कारखान्यास आर्थिक तोषिश बसलेली आहे अशा अनेक बाबींचा पर्दाफाश सुध्दा काटा बंद आंदोलना वेळी करणार आहोत.
तरी घामाचे दाम घेण्यासाठी लवकरच काटा बंद आंदोलनाची तारीख व वेळ मा. खासदार राजु शेट्टी यांच्याशी चर्चा करून जाहिर करण्यात येईल. तरी या आंदोलनात सर्व सभासदांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.