ऊसतोडणी कामगारांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरलं ...अनं पुन्हा एकदा सोमेश्वरकर सरसावले मदतीला....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
आमच्या सगळ्या कोपीत पाणी शिरलं. व्हतं नव्हतं ते समदं भिजून गेलं. खायला काही नव्हतं. सोमेश्वरच्या लोकांनी किराणा, सुका मेवा दिला लई बेस्ट वाटलं, अशा प्रतिक्रिया संतोष पिसाळ, आशाबाई पव्हने या ऊस तोड मजुरांनी व्यक्त केल्या. 
          परवा रात्रीपासून आज सकाळी पर्यंत पाऊस कोसळत होता. यामुळे परिसरात शेतीचे नुकसान झाले पण सर्वात जास्त फटका ऊसतोड मजुरांना बसला. मजुरांच्या कोप्यांमध्ये पाणी शिरले. ते पावसात रात्रभर जागे होते तर सकाळी चूल भिजल्याने उपाशी होते. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, संचालक ऋषी गायकवाड यांच्यासह पथकाने पाहणी करून मजुरांना धीर दिला. कोप्यातील पाणी काढण्यास यंत्रणा लावली आणि सर्वेक्षण करून मदत केली जाणारं आहे. दरम्यान परिसरातील संवेदनशील लोकांनी एकत्र येत या मजुरांसाठी मदत गोळा केली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, सराफ व्यावसायिक किरण आळंदीकर, उद्योजक प्रवीण भोसले यांनी प्रत्येकी पाच किराणा व सुका मेवा किट दिले. तर हेमंत बाजीराव गायकवाड, गजानन गजभारे, हिंदुराव सकुंडे, राहुल शेंडकर, शरद जगताप, युवराज खोमणे, निखिल राऊत, धनंजय गडदरे, तनुजा शहा, शुभम जगताप यांनीही यासाठी सहकार्य केले. यातून ज्या चोवीस मजुर कुटुंबांचा संसार पाण्यात नष्ट झाला अशांना किट देण्यात मोलाचा वाटा उचलला. संतोष शेंडकर, महेश जगताप, दत्ता माळशिकारे, योगेश सोळंस्कर, नौशाद बागवान यांनी वाटप केले.
साद संवाद या वाणेवाडी येथील ग्रुपने स्वेटर, कपडे याचे वाटप केले. यामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे
To Top