इंदापूर ! 'छत्रपती'ची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून सभासदांची दिशाभूल : प्रशांत काटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काटेवाडी : प्रतिनिधी
भवानीनगर येथील श्री छत्रपति सहकारी साखर कारखान्याने आजअखेर २,९३,५९२ मे. टन उसाचे गाळप केले असून २,८२,६०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे व साखरेचा दैनंदिन साखर उतारा ११-१६ टक्के व सरासरी साखर उतारा ९-९६ टक्के इतका आहे व सहवीज निर्मिती प्रकल्पातून ८५,०८,००० युनिटस् बीज निर्यात झाली आहे. कारखान्याने ऊस गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. परंतु काही लोक येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखान्याच्या कामकाजाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत व सभासदांची दिशाभूल करीत आहेत. याबाबतीत केलेल्या आरोपाला उत्तर देताना कारखान्याचे अध्यक्ष श्री. प्रशांत काटे म्हणाले की, कारखान्याचा गळीत हंगाम चालू झालेनंतर ४७ दिवसांनी प्रतिटन रुपये २,२००/- प्रमाणे पहिला अॅडव्हान्स जाहीर केला आहे, असा आरोप करणेत आला आहे. परंतु कारखान्याने विस्तारवाढ व सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीसाठी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते कारखान्याचे उत्पन्नातूनच परतफेड करावयाचे आहेत व त्याची तरतूदही करावी लागते व या कर्जाची परतफेड करावयाची असलेने कारखाना एकरकमी एफआरपी देऊ शकत नाही. कारखान्याची निव्वळ देय्य एफआरपी २,५१३/- इतकी आहे. तरीसुद्धा एफआरपीच्या ८७ टक्के म्हणजे प्रतिटन रुपये २,२००/- प्रमाणे केन पेमेंट आदा केले जात आहे.
               तसेच भागाची दर्शनी किंमत वाढविणेबाबतचा अध्यादेश हा राज्य शासनाचा आहे व या अध्यादेशाची राज्यातील जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी अंमलबजावणी केलेली आहे. बरेचशा कारखान्यांनी वाढीव भागाची रक्कम एक अथवा दोन हप्त्यात कपात करणेचा निर्णय घेतला आहे. परंतु श्री छत्रपति कारखान्याने सभासदांच्या अडचणीचा विचार करून वाढीव भागाची रक्कम तीन टप्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
         चालू गळीत हंगामात संचालक मंडळाने १२ लाख मे. टन ऊस गाळप करणेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील उपलब्ध संपूर्ण उसाचे गाळप करून तसेच उद्दिष्ट पूर्तीसाठी कमी पडणारा ऊस कार्यक्षेत्राबाहेरुन आणून १२ लाख मे. टन गाळप करणेत येणार आहे. जर जास्तीचे गाळप झाले तर त्याचा सभासदांना निश्चितच फायदा होणार आहे.
           साखर व मळी विक्री करणेबाबतचा निर्णय भविष्याचा विचार करूनच घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना आरोप करणारे स्वतः सभागृहामध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी गळीत हंगाम चालू करणेच्या दृष्टीने पैशाची उपलब्धता व्हावी यासाठी साखर व मळीची आगाऊ विक्री करणेबाबतची सूचना मांडली होती. आणि आज खुद्द ते कच्ची साखर विक्री करून कारखाना व सभासदांचा काय फायदा झाला, असा आरोप ते करीत आहेत. वास्तविक पाहता हा निर्णय चुकीचा आहे, असे ते म्हणत असतील तर त्यांनी त्यावेळीच विरोध करावयास पाहिजे होता.
             माळेगाव कारखान्याची कच्ची साखर प्रति क्विंटल रुपये ३,१९० /- या दराने विक्री केली, असा उल्लेख केला आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या दरात दररोज चढ-उतार होत असतो. श्री छत्रपति कारखान्याने प्रति क्विंटल रुपये ३,१००/- व ३,०८०/- प्रमाणे साखर विक्री केली असली तरी सदर साखरेवर २५०० कोटी रुपये अॅडव्हान्स घेतलेला आहे व सदरची रक्कम कारखाना दैनंदिन स्वर्चासाठी बिनव्याजी वापरत आहे व ही रक्कम घेतल्यामुळे संचालक मंडळास योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करता आले. परिणामी चालू गळीत हंगामात उसाचे चांगल्या प्रकारे गाळप होत आहे. कारखान्याने १५ टक्के व्याजाने पैसे घेण्याऐवजी बिनव्याजी पैसे घेतले तर त्यात कारखान्याचा तोटा काय आहे. कच्ची साखर विक्री केल्यामुळे सदर पोत्यावर बँकेचे जादा व्याज भरावे लागणार नाही. त्यामुळे व्याजात बचत होऊन सभासदांचा फायदा होणार आहे. तसेच कच्च्या साखरेवर प्रति क्विंटल रुपये ५००/- प्रमाणे अॅडव्हान्स घेतला आहे व त्याचे लिफ्टींगही चालू आहे व कच्च्या साखरेचे थोड्याच दिवसात रॉक लागणार आहे. त्यामुळे जी कच्ची साखर बिक्री केली आहे. त्याचीही लवकर उचल होणार आहे.
        कारखाना घेत असलेल्या गेटकेन उसाच्या बाबतीत आरोप केलेले आहेत. परंतु कारखाना हा सन २००० सालापासून गेटकेन ऊस घेत आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळी उसाची कमतरता असेल त्या-त्या वेळी गेटकेन ऊस आणलेला आहे. कधी काळी कर्नाटक राज्यातूनसुद्धा ऊस आणलेला आहे. तेव्हा कर्नाटक राज्यामधून जो ऊस आणला तो कोणाच्या हितासाठी आणला. शेवटी संचालक मंडळ हे सभासदांच्या हितासाठी जास्तीत जास्त उसाचे गाळप करून सभासदांना चार पैसे अधिकचे कसे देता येतील या दृष्टीने प्रयत्न करीत असते. गेटकेन ऊस घेण्यासाठी प्रतिटन रुपये ३५०/- इतका खर्च येत नसून तो नियमित वाहतूक खर्चापेक्षा अंदाजे फक्त परटन ४५ /- रुपये इतका जादा आहे व तो यापूर्वी कर्नाटकमधून आणलेल्या उसाचे वाहतूक खर्चापेक्षा निश्चितच कमी आहे.
              यंदाचा साखरेचा उतारा चांगला मिळत आहे. संचालक मंडळाने वेळोवेळी योग्य निर्णय घेऊन चांगल्या पद्धतीचे नियोजन केल्यामुळे यंदाचे गाळप हंगामात उसाचे दैनंदिन गाळपात व रिकव्हरीमध्ये वाढ झालेचे दिसून येत आहे.
-----------------
काही लोकांनी गेल्या १८ वर्षात अनेकवेळा कारखान्याच्या कामकाजाबाबत तक्रारी अर्ज देऊन हा कारखाना अडचणीत आणणेचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा कारखान्याचे कामकाज हे योग्य पद्धतीने चाललेले असून याबाबतीत चुकीचे आरोप करून एक चांगल्या चाललेल्या कामात अडथळा निर्माण करणेचा प्रयत्न केला जात आहे व अशा अपप्रवृत्तीला सभासदांनी त्यांची वेळोवेळी जागा दाखवून दिलेली आहे. कारखान्याचा कारभार चुकीचा आहे का योग्य आहे. याबाबतचा निर्णय सभासद योग्य वेळी देतील, तो निर्णय आरोप करणारांनी घेऊ नये.
To Top