सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक स्वीकृत तर एका तज्ञ संचालकांची निवड शनिवार दि २९ रोजी सकाळी ठीक १० वाजता पार पडणार आहे.
बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याचे
नुकत्याच झालेल्या ऑक्टोबर महिन्याच्या कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तब्बल ४०० उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळावर 'स्वीकृत' संचालक व कामगार संचालक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे कार्यक्षेत्रातील सभासदांचे लक्ष लागले आहे. इच्छुकांनी यासाठी पक्षातील प्रमुखांकडे आधीपासूनच फिल्डींग लावलेली आहे.
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबरमध्ये पार पडली. १४ ऑक्टोबरला झालेल्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या पॅनेलचे उमेदवार १८ हजारांच्या विक्रमी मतांनी निवडून आले होते. २१ जणांच्या निवडून आलेल्या संचालक मंडळात सहकार कायद्यानुसार दोन तज्ञ संचालकांना स्वीकृत पध्दतीने निवडता येते. संचालक मंडळाच्या मासिक सभेस तो अधिकार दिला असून सहकार, साखर कारखानदारीतील अभ्यासू व जाणकार व्यक्तीस निवडणे क्रमप्राप्त असते. याशिवाय कामगारांचा प्रतिनिधी म्हणून एक जणास कामगार संचालक किंवा कार्यलक्षी संचालक म्हणून स्वीकृत पध्दतीने निवड करता येते.
तसेच कामगार संचालक पदासाठी कामगार नेते तुकाराम जगताप यांच्या गटाच्या वतीने रमेश जगताप तर बाळासाहेब काकडे व बाळासाहेब गायकवाड यांच्या गटाकडून तानाजी सोरटे यांनी मागणी केली आहे.