सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार(दि.१७) रोजी १३ जागांसाठी ४५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निंबधक सहकारी संस्था बारामतीचे अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.
११ ते १७ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा कालावधी होता. या दरम्यान सुमारे ४५ अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र प्रसिध्द करण्यात आली. मंगळवार(दि.१८) ला अर्जांची छाननी होणार असून १९ जानेवारीला यादी प्रसिध्द केली जाईल. १९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. अंतिम यादी प्रसिध्द करून ३ फेब्रुवारीला चिन्ह वाटप होणार आहे. १३ फेब्रुवारीला मतदान होऊन त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.
सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक सभासदांनी आपल्या सूचक व अनुमोदकांसह बारामती कार्यालयात गर्दी केली होती. निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून यात कोण बाजी मारतो हे येत्या १३ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. सोसायटी निवडणुकीसाठी एकूण ८१० पात्र सभासद असून ते मतदानाचा हक्क बजावतील. सर्वसाधारण जागेसाठी ८, महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती जमातीतील १, इतर मागास प्रवर्ग मधून १ आणि भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग मधून १ असे १३ उमेदवार मतदारांना निवडून देता येणार आहेत. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारणसाठी सर्वाधिक २६, महिला प्रतिनिधीसाठी ७, अनुसुचित जाती जमातीसाठी ३, इतर मागासप्रवर्ग साठी ३, आणि भटक्या जाती जमाती विशेष मागासप्रवर्ग साठी ४ असे एकूण ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.