'सोमेश्वर'चे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांचेवर गुन्हा दाखल ! माझी व माझ्या कुटुंबाबियांच्या बदनामीचा डाव : शहाजी काकडे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मामा शहाजी काकडे यांनी अकरा वर्षापूर्वी २०११ साली शेअर्सच्या दहा हजार रूपये रकमेचा अपहार केला तसेच आणि अठ्ठावीस वर्षांपूर्वी १९९४ साली बहिणीच्या नावाची जमीन परस्पर विकली असल्याची फिर्याद त्यांचा भाचा अभिजित बापूसाहेब देशमुख (रा. कळंबवाडी ता. बार्शी जि. पुणे) यांनी दिली आहे. याप्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शहाजीराव काकडे यांनी,  किती गलिच्छ पातळीचे हे राजकारण केले जात आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिजित देशमुख ह्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, बहिणी संगीता बापूसाहेब देशमुख (ऐश्वर्या महेंद्रसिंह जाधवराव), मनिषा बापूसाहेब देशमुख (मनिषा राजेंद्र शिंदे), अनिता बापूसाहेब देशमुख (अनिता प्रमोद बर्गे) यांच्या नावे सोमेश्वर कारखान्यात प्रत्येकी पाच हजार रूपयांचे शेअर्स होते. त्यापैकी मनिषा देशमुख व अनिता देशमुख यांच्या नावचे दोन शेअर्सचे दहा हजार रूपये शहाजीराव काकडे यांनी अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधांचा वापर करत १६ नोव्हेंबर २०११ रोजी रोख स्वरूपात काढून घेतले, असा आरोप केला आहे.
 तसेच शहाजी काकडे यांची बहीण सुमन बापूसाहेब देशमुख यांच्या नावे निंबुत येथे असलेली गट क्रमांक १६७ मधील ३.४४ हेक्टर जमीन २३ मार्च १९९४ रोजी बारामती निबंधक कार्यालयात बनावट असाईनमेंट डीड करून आईच्या परस्पर करण मेघराज काकडे व अमेय सुरेश काकडे यांच्या नावे केली. त्यातूनही आर्थिक फसवणूक केली, अशी फिर्याद दिली आहे. अधिकचा तपास पोलिस फौजदार योगेश शेलार करत आहेत. 
काकडे यांनी सांगितले की, सदर तक्रार राजकीय कटकारस्थान असून माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचाच यामागे  प्रयत्न आहे. ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने अधिक काही बोलू शकत नाही. पण लवकरच सत्य समोर येईल यात शंका नाही.
              दरम्यान, चक्क एका कारखान्याच्या अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीवर दहा हजार रुपये अपहार केल्याचा आरोप पाहून तसेच अठ्ठावीस वर्षांपूर्वीची जमीन विक्रीचे प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याचे पाहून लोक  चक्रावले आहेत.
---
To Top