सोमेश्वर रिपोर्टर टीम------
परींचे : प्रतिनिधी
वीर ( ता. पुरंदर ) येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांची यात्रा मागील वर्षी प्रमाणे या वर्षी ही कोरोनाचे नियम पाळून मानकरी, सालकरी, दागिनदार या मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे. तरी राज्यातील सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले.
सासवड ( ता. पुरंदर ) येथील तहसील कचेरी येथे तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली वीर व कोडीत येथील ट्रस्टींच्या उपस्थित बैठकीचे आयोजन झाले.
१५ ते २५ फेब्रुवारी या काळात वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा संपन्न होत असून २५ रोजी "मारामारी" म्हणजे रंगाची सिंपन हा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होते.
यावर्षी यात्राकाळात बैल गाड्यांना परवानगी असणार नाही. तसेच वीर येथील मंदिरासमोर बाहेरील दुकानदारांना परवानगी नाही. पालखीबरोबर येणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. बाहेरून नाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. तसेच दोन कोरोनाचे डोस घेतलेल्यांनाच मंदिरात परवानगी दिली जाईल. या गोष्टी वीर देवस्थान व भाविकांनी कटाक्षाने लक्ष ठेवावे असे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या वतीने यात्राकाळात भाविकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, तसेच कचरा व्यवस्थापन करावे, आरोग्य विभागाच्या वतीने यात्रा काळात आरोग्य सुविधाकडे लक्ष घ्यावे. बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे. यात्राकाळात विद्युत पुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरण आपली यंत्रणा सक्षम ठेवावी. जेजुरी नगरपालिकेच्या वतीने अग्निशामक गाडी यात्रा काळात उपलब्ध करून द्यावी अशा विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
छबिना सुरू असताना मंदिर दर्शन बारी बंद असेल व छबिना झाल्यानंतर दर्शनबारी सुरू राहील.
यावेळी बैठकीस वीर देवस्थानचे अध्यक्ष संतोष धुमाळ, उपाध्यक्ष रविंद्र धुमाळ, सचिव अभिजित धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, रामभाऊ धुमाळ, बाळासाहेब धुमाळ, नामदेव जाधव, राजेंद्र कुरपड तसेच कोडीत देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे, पोलीस पाटील गणेश बडदे, अनिल बडदे, शेखर बडदे, ईश्वर बडदे आदी उपस्थित होते.
१५ फेब्रुवारी दुपारी कोडीत येथून देव वीर येथे जातात. त्यानंतर २५ ला वीर येथे मारामारी म्हणजे रंगाची सिंपन होऊन २६ तारखेला देवांचा कोडीत येथे वरातीचा कार्यक्रम होईल असे कोडीत देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब बडदे यांनी सांगितले.