दिल्लीतील पत्रकारितेत महाराष्ट्र परिचय केंद्राची उत्तम साथ : ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

Pune Reporter
नवी दिल्ली, दि:१६
दिल्लीतील पत्रकारितेच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात महाराष्ट्र परिचय केंद्राची उत्तम साथ लाभली, अशा भावना ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी आज येथे व्यक्त केल्या.

दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो कार्यालयाचे  वृत्त विभागप्रमुख म्हणून बागाईतकर सेवानिवृत्त झाले या पार्श्वभूमीवर परिचय केंद्रात त्यांचा छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सन्मान केला. माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.

दिल्लीत काम करताना मराठी पत्रकारांना महाराष्ट्र परिचय केंद्राचा मोठा आधार असतो. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत परिचय केंद्राची खूप मदत झाली व या केंद्राने उत्तम सहकार्य केल्याची भावना श्री. बागाईतकर यांनी व्यक्त केली. पत्रकारितेच्या विविध टप्प्यांवर अनुभवलेली दिल्ली तसेच येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, साहित्यिक अशा विविध पैलूंचा केलेला अभ्यास व प्रत्यक्ष कामाचा अनुभव, अशा विविध आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा  दिला. 

अनंत बागाईतकर यांच्या पत्रकारितेतील प्रवासाविषयी…

बागाईतकर हे गेल्या ४० वर्षांपासून सक्रिय पत्रकारितेत आहेत. पत्रकारितेची पदवी संपादन करून पुण्यातील ‘दैनिक केसरी’ वृत्तपत्रातून डिसेंबर १९७९ मध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. १९८६ मध्ये  ‘दैनिक केसरी’चे दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. १९८९-९४ दरम्यान त्यांनी ‘जन्मभूमी’ या गुजराती  वृत्तपत्र समूहासाठीही  दिल्ली विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य केले. १९९४ पासून त्यांनी दैनिक सकाळच्या दिल्ली ब्युरो कार्यालयात विशेष प्रतिनिधी म्हणून कार्याला सुरुवात केली व या कार्यालयात ते गेल्या १० वर्षांपासून वृत्त विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत ‍होते.‘माध्यमे आणि राजसत्ता’ ही त्यांची पुस्तिका प्रकाशित आहे.

दिल्ली आकाशवाणी, लोकसभा टिव्ही, राज्यसभा टिव्ही, एनडी टिव्ही आदींवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा सहभाग राहिला. वर्ष २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुककाळात त्यांनी दिल्ली आकाशवाणीवरून या निवडणुकांचे विश्लेषण केले. त्यांनी २०१८-१९ मध्ये  प्रेस क्लब ऑफ इंडिया या पत्रकारितेतील नामांकित संस्थेचे अध्यक्ष तर २०१९-२० मध्ये महासचिव पद भूषविले आहे. लोकसभा अध्यक्षांच्या माध्यम सल्लागार समितीवर त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे. माजी लोकसभा अध्यक्ष दिवंगत सोमनाथ चटर्जी यांच्या कार्यकाळात त्यांनी या समितीचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.मागील काही वर्षांपासून यांनी राज्यसभेच्या माध्यम सल्लागार समितीचे सचिवपदही भूषविले.
To Top