बिग ब्रेकिंग ! बारामतीतील 'या' साखर कारखान्यावरील एमडीच्या केबिनमध्येच केला पेटवून घेण्याचा प्रयत्न

Pune Reporter
बारामती दि ७

वादामुळे कारखाना ऊस नेत नसल्याच्या कारणावरून समीर शहाजी धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. बारामती) यांनी  येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात कार्यकारी संचालकांच्या कक्षात अंगावर डिझेल अोतून घेतले. हा प्रकार सोमवारी (दि. ७) रोजी दुपारी घडला. दरम्यान लागलीच धुमाळ यांना आवरण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु अचानक झालेल्या या घटनेने प्रशासनाची मोठी धांदल उडाली.

समीर धुमाळ यांचा भावकीतील एकाशी शेत जमिनीचा वाद आहे. त्यांच्यातील वादातून ऊसतोडणी रखडल्याने समीर यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २५ वर्षांपासून या क्षेत्राच्या सात-बाऱयात उभय पक्षांची नावे आहेत. समीर व त्यांचे भाऊ हे क्षेत्र वहिवाटतात. या वादग्रस्त क्षेत्रातून यापूर्वी समीर यांनी माळेगाव कारखान्याला ऊस घालत त्याचा परतावाही प्राप्त केलेला आहे. परंतु ज्यांच्याशी वाद सुरु आहे, त्यांनी कारखान्याला अर्ज दिल्यामुळे समीर यांच्या ऊसाची तोडणी होवू शकली नाही. ऊसाचे अतोनात नुकसान झाल्याने हवालदील झालेल्या समीर यांनी अखेर कार्यकारी संचालकांच्या कक्षात अंगावर डिझेल अोतून घेतले. भावकीसोबतच्या जमिनीच्या कौटुंबिक वादातून धुमाळ यांनी हा प्रकार केलेला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

To Top